लातूर, दि. 26 : लोकनेते विलासराव देशमुख यांच्या दूरदृष्टी नेतृत्वामुळे लातूर जिल्ह्याची सहकार चळवळ अग्रेसर आहे. मांजरा परिवाराने साखर कारखानदारीत एक नवा उच्चांक निर्माण करून सर्वांसमोर आदर्श ठेवला आहे. या आदर्शानुसार सहकारातील संस्थांनी वाटचाल करण्याची गरज आहे, असे मत जिल्हा कॉंग्रेसचे अध्यक्ष अॅड. व्यंकट बेद्रे यांनी सोमवारी येथे बोलताना व्यक्त केले. लातूर मल्टीस्टेट कोऑप क्रेडीट सोसायटीच्या सहाव्या वर्धापन दिनानिमित्त येथील हॉटेल पार्थच्या सभागृहात स्नेह मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते, यावेळी अॅड. व्यंकट बेद्रे बोलत होते. याप्रसंगी वैधानिक लेखा परिक्षक सीए सचिन शिंदे, हास्यसम्राट तथा व्याख्याते अशोक देशमुख, संस्थेचे चेअरमन जेजी सगरे, पीएन बंडगर, संचालक ऋषीकेश बद्दे, कुशावर्ता बेळ्ळे, नबी शेख, व्हीएल कांबळे, कार्यकारी संचालक इसरार सगरे आदींची प्रमुख उपस्थिती होती.
संस्थेच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांचा उल्लेखनीय कामगिरीबद्दल सत्कार करण्यात आला. विलासरावांच्या नेतृत्वात जिल्ह्यात ज्या संस्था निर्माण झाल्या. त्या आजही पारदर्शक कारभारातून प्रगतीपथावर आहेत, असे नमूद करून अॅड. बेद्रे म्हणाले की, साखर कारखानदारीत मांजरा परिवाराने एक नवा पॅटर्न निर्माण केला. हा मांजरा पॅटर्न संपूर्ण महाराष्ट्रात आज नावलौकिक झाला आहे. सहकारातील संस्थांनी मांजराचा हा आदर्श समोर ठेवून वाटचाल केल्यास संस्था यशाच्या शिखरावर पोहचतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
संस्थेचे चेअरमन जेजी सगरे यांनी समाजातील शेवटच्या घटकापर्यंत ही संस्था पोहचली असून त्यांना कर्ज देऊन त्यांच्यात आर्थिक पत निर्माण करण्याचे काम केले जात आहे, अशी माहिती दिली. शेतकरी, कष्टकरी, बचत गटांना प्रामुख्याने पतपुरवठा करण्यात आला आहे. अधिकारी व कर्मचाऱ्यांचे कष्ट, पारदर्शक व्यवहार यामुळे ही संस्था अवघ्या सहा वर्षांत नावारूपाला आल्याचे सगरे यांनी सांगितले. बंडगर यांनी या संस्थेत चांगले काम करण्याची स्पर्धा निर्माण झाली असून संचालक मंडळ विश्वस्तांच्या भूमिकेत काम करत असल्याचे त्यांनी सांगितले. संस्थेचा पारदर्शक कारभार पाहता या संस्थेला भवितव्य असल्याचे शिंदे यांनी सांगितले. कार्यकारी संचालक इसरार सगरे यांनी संस्थेकडे २१ कोटी रूपयांच्या ठेवी व १३ कोटी रूपयांचे वाटप असल्याचे आपल्या प्रास्ताविकात सांगितले.
Comments