मुंबई: भारतीय जनता पक्ष आणि शिवसेनेचे सरकार म्हणजे एक अरिष्ट् असल्याची भावना राज्यातील आणि देशातील जनतेमध्ये तयार झाली आहे. या लोकभावनेचा आदर करून हे सरकार चालविण्यासाठी सर्व समविचारी पक्षांनी एकत्र यावयास हवे, असा सूर मुंबई येथे आ. अमित देशमुख यांच्या पुढाकारातून आयोजित महाआघाडी संवादातून पुढे आला. या संवादात सहभागी होताना राज्याचे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी राज्यात व देशात परिवर्तनाचे वारे वाहत आहेत. केंद्र व राज्य ही दोन्ही सरकारे बदलायला हवीत अशी लोकांची इच्छा आहे त्यामुळे समर्थ पर्याय निर्माण करणे ही आपली जबाबदारी आहे. राज्यात १९९९ पासून समविचारी पक्षांची आघाडी आहे ती अधिक भक्कम करण्यासाठी काँग्रेसचे अध्यक्ष खा. राहूल गांधी, राष्ट्रवादीचे नेते खा. शरद पवार सक्रिय झाले आहेत. त्यांचा आदेश आपण सर्वांना मान्यच राहणार आहे. हिवाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेससह इतर समविचारी पक्षांचे लोकप्रतिनिधी व प्रमुख नेत्यांमध्ये चर्चा घडून यावी यादृष्टीने भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे सचिव, माजी राज्यमंत्री आमदार अमित देशमुख यांनी पुढाकार घेवून मंगळवारी सायंकाळी चर्चगेट येथील मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या सभागृहात महाआघाडी संवादाचे आयोजन केले होते. यावेळी माजी मुख्यमंत्री तथा प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष खा. अशोक चव्हाण, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार, राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, शेतकरी कामगार पक्षाचे आ. जयंत पाटील, रिपब्लिक पक्षाचे प्रा. जोगेंद्र कवाडे, लोकभारतीचे कपील पाटील, समाजवादी पक्षाचे प्रदेशाध्यक्ष अबू आझमी यासह समविचारी राजकीय पक्षांचे प्रमुख नेते उपस्थित होते.
Comments