HOME   लातूर न्यूज

घर तेथे ग्रंथ चळवळ व्हावी- डॉ. वाघमारे

मानवी संस्कृती समृध्द करण्यासाठी वाचन संस्कृतीची अत्यंत आवश्यक


घर तेथे ग्रंथ चळवळ व्हावी- डॉ. वाघमारे

लातूर: राज्यात ग्रंथालय चळवळ उत्साहाने सुरू आहे. राज्य शासनाचा ग्रंथेात्सावातून वाचन संस्कृती जोपसाण्याचा चांगला प्रयत्न असून प्रत्येक घरात एक तरी ग्रंथ असला पाहिजे याकरिता ‘घर तेथे ग्रंथ’ ही चळवळ व्हावी. तसेच मानवी संस्कृती समृध्द करण्यासाठी वाचन संस्कृतीची अत्यंत आवश्यकता असल्याचे प्रतिपादन माजी कुलगुरु ज्येष्ठ साहित्यीक डॉ. जनार्दन वाघमारे यांनी केले. जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालय लातूर यांच्या वतीने दगडोजीराव देशमुख सभागृहात दोन दिवसीय लातूर ग्रंथोत्सवाचे उदघाटन झाले. याप्रसंगी अध्यक्ष स्थानावरून डॉ. वाघमारे बोलत होते. यावेळी उदघाटक खासदार डॉ. सुनिल गायकवाड, अप्पर जिल्हाधिकारी पुरुषोत्तम पाटोदकर, जिल्हा ग्रंथालय संघाचे अध्यक्ष ॲड. त्रंबकदास झंवर, विभागीय माहिती कार्यालयाचे उपसंचालक (माहिती) यशवंत भंडारे, सहाय्यक ग्रंथालय संचालक अशेाक गाडेकर, साहित्यिक भास्कर बडे, जिल्हा ग्रंथालय अधिकारी सुनिल गजभरे अदिसह ग्रंथ प्रेमी नागरिक मोठया संख्येने उपस्थित होते.
राज्यात 36 हजार गावे असून ग्रंथालयांची संख्या ११ हजार ५०० इतकीच दिसून येत आहे. त्यामुळे प्रत्येक गावात किमान एक ग्रंथालय असावे याकरिता आपण शासनस्तरावर पाठपुरावा करणार असल्याची माहिती खासदार डॉ. सुनिल गायकवाड यांनी उदघाटनपर भाषणात दिली. तसेच आपल्या जिल्हयात ई- ग्रंथालय उपक्रम राबविण्यासाठी जिल्हा ग्रंथालय कार्यालयाने पुढकार घेण्याची सुचना त्यांनी केली.
आजच्या डिजिटलायझेनशच्या काळात ग्रंथालय चळवळ टिकून राहावी याकरिता शासनाने पाठबळ देण्याची मागणी जिल्हा ग्रंथालय संघाचे अध्यक्ष ॲड. झंवर यांनी केली. समाजातील लोक वाचन संस्कृती टिकविण्यासाठी धडपड करतात परंतू दुसऱ्या बाजुला आपल्या पाल्यांना इंग्रजी माध्यमाच्या शाळेतून शिक्षण देतात. हा दुटप्पीपणा लोकांनी सोडून देऊन मराठी ग्रंथ संपदाचे वाचन करून ते पाल्यांना ही सांगण्याची सूचना अप्पर जिल्हाधिकारी डॉ. पाटोदकर यांनी केली. तसेच पुस्तक वाचानातून मेंदुत डोपामीन व सिरोमीन हे द्रव्य पाझरत असल्याने अति उच्च प्रतीचा आनंद मिळत असल्याचे सांगून ग्रंथ वाचन नियमित करण्याचे आवाहन त्यांनी केले. विभागीय माहिती उपसंचालक यशवंत भंडारे यांनी ग्रंथ घरोघरी पोहचविण्यासाठी ग्रंथोत्सव महत्वपुर्ण असून त्यातून वाचन संस्कृती वाढीस लागते असे सांगितले. तसेच समाज माध्यामाच्या अती वापराने वाचन संस्कृतीला धोका निर्माण झालेला असून जास्तीत जास्त लोकांनी ग्रंथाचे वाचन करण्याचे आवाहन त्यांनी केले. यावेळी साहित्यिक भास्कर बडे यांनी मनोगत व्यक्त केले
जिल्हा ग्रंथालय अधिकारी श्री. गजभरे यांनी लातूर ग्रंथोत्सवाच्या आयोजनाचा उद्देश सांगूनन या दोन दिवसीय कार्यक्रमाची रूपरेषा प्रस्ताविकात स्पष्ट केली.


Comments

Top