लातूर: संभाजी पाटील निलंगेकर विरोधात असताना त्यांनी एका अधिकार्याच्या खुर्चीचा लिलाव केला होता. आता ते सत्तेत आहेत पण शेतकरी अडचणीत आहेत. ते लक्ष द्यायला तयार नाहीत असं सांगत शिवसेनेचे अभय साळुंके यांनी संभाजीरावांच्या खुर्चीचा लिलाव ठेवला आहे. या लिलावात भाग घेण्यासाठी १०० रुपयांचं शुल्क आकारण्यात येत आहे. यात आता अशोकराव पाटील निलंगेकरही सहभागी झाले आहेत. त्यांनी नुकतेच शंभर रुपयांचे शुल्क भरुन नोंदणी केली. खुर्ची प्रकरणामुळं निलंग्यातलं राजकीय वातावरण तापत आहे. या लिलावाचा प्रचार करण्यासाठी अभय साळुंके गावोगावी जाऊन शेतकर्यांचे प्रबोधन करीत आहेत. आजवर ३०० हून अधिकजणांनी नोंदणी केली आहे. कॉंग्रेस-राष्ट्रवादीच्या सत्ता काळात आंदोलन करीत विद्यमान पालकमंत्र्यांनी अधिकार्याच्या खुर्चीचा लिलाव केला होता. आता भाजपा सरकार सत्तेत असताना शेतकर्यांच्या प्रश्नांवर पालकमंत्र्यांच्या खुर्चीचा लिलाव कोणी करायचा असा सवाल अशोक निलंगेकर यांनी जनआक्रोश मोर्चात उपस्थित केला होता. त्याला प्रतिसाद देत अभय साळुंके यांनी खुर्चीचा लिलाव करु असे जाहीर केले. त्यासाठी ते मतदारसंघात शेतकरी जागृती अभियान राबवत आहेत. २१ डिसेंबर पर्यंत ५ हजारांपेक्षा अधिक पावत्या फ़ाडून निलंग्यात खुर्चीचा जाहिर लिलाव करणार आहेत. त्यातुन मिळालेली रक्कम मुख्यमंत्री सहाय्यता निधीत जमा करू असे अभय साळुंके यांनी सांगितले.
Comments