लातूर: लातूर येथील शासकीय वैद्यकिय महाविद्यालयातील विद्यार्थीनीच्या कथित विनयभंग प्रकरणी निष्पक्ष चौकशी करुन दोषीवर कडक कारवाई करावी व संबंधित विद्यार्थीनीला संरक्षण देण्यात यावे, विद्यार्थिनीवर कोणताही दबाव येणार नाही याची दक्षता घेण्यात यावी, अशी मागणी काँग्रेस पक्षाच्या वतीने महाविद्यलयाचे अधिष्ठाता यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यलयातील एका वरिष्ठ प्राध्यापकाने आपला विनयभंग केला असून, त्यांच्याकडून सातत्याने छळवणूक होत असल्याची तक्रार एका विद्यार्थिनीने पोलीसात दिली आहे. सदरील तक्रार परत घ्यावी यासाठी आपल्यावर संबंधिताकडून दबाव येत आहे. त्यामुळे आपल्याला मदत व सहकार्य करण्याची विनंती त्या विद्यार्थीनीने लातूर शहरचे आमदार अमित देशमुख यांच्याकडे एका पत्राद्वारे केली आहे. विद्यार्थीनीच्या पत्राची दखल घेऊन अमित देशमुख यांनी या प्रकरणात लातूर महिला काँग्रेस व युवक काँग्रेसने लक्ष घालावे, अशा सूचना दिल्या आहेत. आमदार देशमुख यांच्या सूचनेनुसार काँग्रेस पक्षाच्या शिष्टमंडळाने गुरुवारी सकाळी वैद्यकीय महाविद्यलयाचे प्रभारी अधिष्ठाता डॉ. श्रीकांत गोरे यांची भेट घेऊन त्यांना निवेदन सादर केले. सदर प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करावी, संबंधित विद्यार्थिनीला संरक्षण तसेच आधार देण्याची विनंती या निवेदनात करण्यात आली आहे. या शिष्टमंडळात लातूर शहर महिला काँग्रेसच्या अध्यक्षा तथ नगरसेविका सपना किसवे, दिप्ती खंडागळे, पुजा पंचाक्षरी, शैलजा आराध्ये, काँग्रेस ब्लॉक अध्यक्ष दगडूआप्पा मिटकरी, संजय निलेगावकर, शहर युवक काँग्रेस अध्यक्ष महेश काळे, ओबीसी सेल अध्यक्ष नेताजी बादाडे, अल्पसंख्यांक सेल अध्यक्ष अॅड.फारुख शेख, अॅड. किरण जाधव, विकास बँकेचे संचालक व्यंकटेश पुरी, एम.एच. शेख, सुमित खंडागळे आदींची उपस्थिती होती.
Comments