HOME   लातूर न्यूज

ग्रंथोत्सवातून वाचन संस्कृतीला चालना मिळेल

जिल्ह्यात साहित्याचा जागर घालण्याचे काम चालू, परिसंवादांचे आयोजन


ग्रंथोत्सवातून वाचन संस्कृतीला चालना मिळेल

लातूर: महात्मा फुले यांनी अविद्येमुळे किती अनर्थ झाला याचा उहापोह केलेला आहे, त्याचबरोबर जिथे ग्रंथ नाही तिथे ज्ञान नाही हे खूप महत्वाचे असल्याचे सांगून वाचनाच्या माध्यमातून मानवी जीवन आत्यंतिक समृध्द होते. ग्रंथोत्सवासारखे प्रयोग वाचन संस्कृतीला चालना देण्याचे काम करत आहेत, असे प्रतिपादन विवेकानंद वैद्यकीय प्रतिष्ठानचे संचालक डॉ. अशोकराव कुकडे यांनी केले. महाराष्ट्र राज्य उच्च व तंत्र शिक्षण विभाग, ग्रंथालय संचालनालय, जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालय, लातूरच्या वतीने कृषी उच्चतम बाजार समितीच्या दगडोजीराव देशमुख सांस्कृतिक सभागृहात आयोजित ग्रंथोत्सव २०१७ च्या समारोप सत्रात प्रमुख पाहुणे म्हणून डॉ. कुकडे बोलत होते. अध्यक्षपदी मराठवाडा ग्रंथालय संघाचे तथा लातूर जिल्हा ग्रंथालय संघाचे अध्यक्ष त्र्यंबकदास झंवर हे उपस्थित होते.
दुसरे प्रमुख पाहुणे प्रा. डॉ. शेषराव मोहिते यांनी लेखक आणि वाचनकांना जोडण्याचे काम ग्रंथालये करत असतात.त्यातल्या त्यात ग्रंथालयात काम करणारा ग्रंथपाल हा अतिशय महत्वाचा घटक असतो. साहित्यिकांच्या जडण घडणीत ग्रंथपालाचा मोलाचा वाटा असतो असे सांगितले. लातूरचा ग्रंथोत्सव म्हणजे जणू मिनी साहित्य संमेलनच ठरले. अशा ग्रंथोत्सवामुळे सांस्कृतिक वातावरण समृध्द व्हायला मदत होते. आत्मबळ देण्याचे काम होते. लातूरने जे जे केले ते ते राज्याला दिशादर्शक ठरते असेही मत त्यांनी व्यक्त केले.
समारोप सत्राच्या अध्यक्षीय भाषणात त्र्यंबकदास झंवर यांनी ग्रंथोत्सवाच्या माध्यमातून लातूर जिल्ह्यात साहित्याचा जागर घालण्याचे काम चालू आहे. लातूर जिल्ह्यातील विचारवंत,
साहित्यिक हे आपलं खूप मोठं वैभव आहे असे सांगून आगामी काळात लातूर जिल्ह्यातील तालुका ग्रंथालय संघाने परिसंवादाचे आयोजन करावे अशी अपेक्षा व्यक्त केली. या कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात जिल्हा ग्रंथालय अधिकारी सुनील गजभारे यांनी दोन दिवसांच्या यशस्वी ग्रंथदिंडी, ग्रंथप्रदर्शन, परिसंवाद, कविसंमेलनाने वाचन संस्कृतीला उजाळा देण्याचे काम झाले. यासाठी जिल्हाधिकारी कार्यालय, जिल्हा माहिती अधिकारी कार्यालय, वृत्तपत्रे, शिक्षण विभाग, विविध शाळा, जिल्हा सार्वजनिक ग्रंथालयाचे पदाधिकारी, सार्वजनिक ग्रंथालयाचे कार्यकर्ते, ग्रंथपाल, साहित्यिक, ग्रंथप्रेमींनी दिलेला प्रतिसाद आगामी काळात अधिक जोमाने काम करण्याची प्रेरणा देणारा ठरल्याचे सांगून आभार प्रदर्शन केले. सूत्रसंचालन बाळ होळीकर यांनी केले. या कार्यक्रमाला असंख्य कार्यकर्ते, ग्रंथप्रेमी उपस्थित होते.


Comments

Top