लातूर: नगरसेवक गौरव काथवटे यांनी आपला वाढदिवस सामाजिक उपक्रमांद्वारे साजरा केला. अंध मुलांसोबत भोजन, प्रभागाची स्वच्छता व वृध्द नागरिकांसाठी सिमेंटचे बाक बसवून देणे शिवाय शासकीय रुग्णालयात तपासणीसाठी येणार्या एडस्बाधित मुलांना खेळणी वाटप करुन अनोख्या पध्दतीने वाढदिवस साजरा केला. अंध शाळेत शिकणारी मुले शिक्षण घेतात परंतू त्यांना इतरांप्रमाणे मौजमजा करता येत नाही. किंबहूना सामान्य मुलाप्रमाणे ते जगू शकत नाहीत. हीच बाब लक्षात घेऊन गौरव यांनी या मुलांची सहलच काढली. हॉटेलमध्ये भोजन देण्याचा निर्णय घेतला. शहरातील नामांकित हॉटेलमध्ये त्यांनी या मुलांना केवळ जेवण दिले नाही तर स्वतः देखील त्यांच्या सोबत जेवणाचा आस्वाद घेतला. यामुळे या अंध मुलांना नवा अनुभव मिळाला. यावेळी नगरसेवक युनूस मोमीन, इम्रान सय्यद यांच्यासह हमीद पाशाबागवान, मनजीत नरहरे, रोहित काळे, शंकर रसाळ आणि मित्र परिवार उपस्थित होता. शासकीय रुग्णालयात एडस् बाधित रुग्णांची तपासणी करण्याची विशेष सोय आहे. या ठिकाणी दररोज एडस् बाधित मुले तपासणीसाठी येतात. अनेक वेळा त्यांना डॉक्टरांची वाट पहावी लागते. यामुळे ही मुले कंटाळतात. अशा ठिकाणी या मुलांना विरंगुळा म्हणून एचआयव्ही ओपीडीसाठी प्ले कॉर्नर ही शासनाची संकल्पना आहे. या संदर्भात शासकीय वैद्यकिय महाविद्यालय व सर्वोपचार रुग्णालयाचे अधिष्ठता डॉ. गोरे यांनी काथवटे यांच्याशी संपर्क साधून त्यासाठी सहकार्य करण्याचे आवाहन केले होते. रोटरी क्लबकडून कांही मदतीची विनंती त्यांनी केली होती. अनुषंगाने त्यांनी रोटरीच्या माध्यमातून शनिवारी एचआयव्ही तपासणी कक्षाला खेळणी भेट दिली. काथवटे यांच्या वाढदिवसानिमित्त प्रभागात स्वच्छता मोहिम राबविण्यात आली. यासह वृध्द नागरीकांसाठी ठिक-ठिकाणी सिमेंटचे बाक देण्यात आले. शहरातील संजयनगर भागातील बुध्द समाजमंदिर, गणेश चौक येथील गणेश मंदिर आणि स्कॅप मार्केंटच्या बाजूस असणारा जॉगिंग ट्रॅक जवळ असे बाक बसविण्यात आले. शहरातील राहूलनगर भागात मुतारीची जागा स्वच्छ करुन तेथेही बाक बसविण्यात आले.
Comments