लातूर: जिल्ह्यातील शेतकर्यांचे सोयाबीन खरेदी करण्यासाठी १० हमीभाव खरेदी केंद्रे सुरू करण्यात आली आहेत. या केंद्रांवर शुक्रवार अखेरीस १६ हजार २०० क्विंटल सोयाबीनची खरेदी करण्यात आली आहे. सोयाबीन विक्रीसाठी जिल्ह्यातील एकूण २० हजारांपेक्षा अधिक शेतकर्यांनी अॅनलाईन नोंदणी केली आहे. यातील १० हजारांपेक्षा अधिक शेतकर्यांना हमीभाव केंद्राच्या वतीने एसएमएसद्वारे माहिती देण्यात आली आहे. लातूर जिल्ह्यात १५ ऑक्टोबर पासून नाफ़ेड्च्यावतीने सोयाबीन हमीभाव खरेदी केंद्र सुरू करण्यात आली आहेत. यामध्ये लातूर, उदगीर, अहमदपूर, निलंगा, औसा, रेणापूर, देवणी, चाकूर, साकोळ आणि जळकोट येथे ही हमी केंद्रे सुरू झाली आहेत. सोयाबीन खरेदीसाठी नाफ़ेड्च्यावतीने यंत्रणा सज्ज ठेवण्यात आली आहे. लातूर जिल्ह्यातील एखूण १० केंद्रावर १६ हजार २०० क्विंटल सोयाबीनची खरेदी करण्यात आली. खरेदी पूर्वी ऑनलाईन पद्धतीने नोंदणी करणे बंधनकारक आहे. नोंदणी केल्यानंतर सोयाबीन खरेदी केंद्र प्रमुखाला दाखवून घेणे गरजेचे आहे. खरेदी केंद्राकडून हिरवा कंदील मिळाल्यानंतर संबधित शेतकर्यांना तारीख आणि वेळ कळविली जाते. त्या वेळेनुसार शेतकर्यांनी सोयाबीन विक्रीसाठी आणावे असे सांगितले जाते. त्यामुळे शेतकर्यांना सोयाबीन खरेदी करण्यासाठी दिवस दिवस वाहनांसह केंद्रावर थांबण्याची गरज नाही. १२% पेक्षा अधिक ओलावा असलेल्या सोयाबीनला हमी केंद्रावर नाकारले जाते. किमान १२% आर्द्रता असणार्या आणि निकषात बसलेल्या सोयाबीनला खरेदीसाठी हिरवा कंदील दाखविला जातो, अशी माहिती नाफ़ेडच्यावतीने देण्यात आली.
Comments