लातूर: फडणवीस सरकारच्या कर्जमाफीने अनेक ऐतिहासिक घोळ घातले. या कर्जमाफीवर एक छानसे पुस्तकही होऊ शकते. यातले अनेक किस्से आपणही जाणता. काही दिवसांपूर्वी बारावीत शिकणार्या आणि शेतीच नसणार्या प्रज्वल जाधवच्या नावावर दहा हजार रुपये जमा झाल्याचा मेसेज आला होता. त्यात नमूद केलेले खातेही प्रज्वलचे नव्हते. असे अनेक घोटाळे विधानसभेत मांडण्यात आले. त्यात प्रज्वलच्या प्रकरणाचाही समावेश होता. हे सारे प्रकार बघून सरकारी यंत्रणा कामाला लागली. त्या खात्याचा शोध घेण्यात आला. योगायोगाने ते खाते जिल्हा बॅंकेचे निघाले आणि खातेदाराचे नाव इंदूबाई वसंत शिंदे असल्याचे निष्पन्न झाले. उतकाच्या इंदूबाईंनी जो मोबाईल नंबर बॅंकेत दिला होता तो काही दिवसांनी बंद केला होता. संबंधित मोबाईल कंपनीने पुढे या नंबरचे सीम प्रज्वलला दिले. त्यामुळे १० हजाराच्या कर्जमाफीचा संदेश प्रज्वलच्या मोबाईलवर आला होता. संदेश प्रज्वलच्या मोबाईलवर आला असला तरी कर्जमाफीची रक्कम मात्र इंदुबाईच्या खात्यावरच जमा झाल्याचे जिल्हा उपनिबंधक कार्यालयाच्या अधिकार्यांनी सांगितले.
Comments