लातूर: आजची मुले ही उद्याचे जबाबदार नागरिक आहेत. त्यामुळे त्यांच्या मनात निसर्गाबद्दल ओढ निर्माण करण तसेच त्यांना पर्यावरण रक्षणाच्या जबाबदारीची जाणीव व्हावी याकरिता इको फोक्स संस्था मुंबई, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ, गरवारे कम्युनिटी सेंटरचे गरवारे बाल भवन औरंगाबाद आणि हॅथवे एमसीएन केबल नेटवर्क लातूर यांच्या संयुक्त विद्यमाने पर्यावरणावर आधारित मराठवाडा विभागीय आंतरशालेय (माध्यमिक विभाग) एकांकिका स्पर्धाचे आयोजन करण्यात आले आहे.
या स्पर्धेसाठी जिल्हास्तरीय लातूर जिल्ह्याची प्राथमिक फेरी ११ जानेवारी २०१८ रोजी सकाळी १० ते सायंकाळी ५ या वेळेत दगडोजीराव देशमुख सांस्कृतिक सभागृह येथे आयोजित करण्यात आली आहे. ज्या शाळांना या स्पर्धेत सहभाग घ्यायचा असेल अशा शाळांनी ०७ जानेवारी २०१८ पर्यंत आपली प्रवेशिका दीपरत्न निलंगेकर, हॅथवे एमसीएन केबल नेटवर्क, पहिला मजला, आय.सी.आय.सी.आय. बँक, पारिजात मंगल कार्यालय औसा रोड लातूर येथून घेऊन नोंद कराव्यात. स्पर्धा विनामुल्य आहे. स्पर्धेत सहभागी होणार्या सर्व शाळांना प्रशस्तीपत्र देण्यात येणार आहे. स्पर्धक शाळांमधुन पर्यावरण मित्र शाळेकरिता तीन विशेष पारितोषिक देण्यात येतील. त्याकरिता पर्यावरण संवर्धनासाठी शाळेमार्फत शैक्षणिक वर्ष २०१७-१८ दरम्यान आयोजित करण्यात आलेल्या उपक्रमाची सविस्तर माहिती, विद्यार्थी सहभाग संख्या तसेच कार्यक्रमाचे फोटो (फिल्म प्रेझेंटशन) आदी माहिती प्राथमिक फेरीच्या वेळेस आयोजकांकडे जमा करणे शाळांना बंधनकारक राहिल.
स्पर्धेसाठी विभाग स्तरावरील बक्षीस प्रथम क्रमांक १५००० रुपये, द्वीतीय १०,००० रुपये, तृतीय ५००० रुपये आणि उत्तेजनार्थ २००० रुपयाची रोख चार बक्षिसे, दिग्दर्शनासाठी प्रथम ५००० रुपये, द्वीतीय ३००० रुपये, तृतीय २००० रुपये. पर्यावरण एकांकिका लेखनासाठी प्रथम ५००० रुपये, द्वीतीय ३००० रुपये, तृतीय २००० रुपये. शिवाय बेस्ट अॅक्टर मुला - मुलींसाठी प्रथम ३००० रुपये, द्वितीय २००० रुपये, तृतीय १००० रुपये अशा स्वरुपात रोख पारितोषिक, सन्मानचिन्ह, प्रशस्तीपत्र देण्यात येणार आहे. पर्यावरण प्रकल्पासाठी प्रशस्तीपत्र व गौरवचिन्ह देण्यात येणार आहे.
लातूर जिल्हा पातळीवर प्रथम आणि द्वीतीय येणार्या संघांना विभागीय पातळीवरील स्पर्धेसाठी औरंगाबाद येथे पाठविण्यात येणार आहे. एकांकिका स्पर्धेसाठी ‘स्वच्छ शहर, सुंदर शहर’, पाण्याचे नियोजन काळाची गरज, आधुनिक शेती साधेल प्रगती, वृक्षारोपण व वृक्षसंगोपन, विकसीत भारतामध्ये पर्यावरणाचे संतुलन आदी विषय ठेवण्यात आले आहेत. प्रत्येक शाळेतून एकाच संघाला सहभागी होता येईल. अधिक माहितीसाठी दीपरत्न निलंगेकर (९४२२०७१३६३) यांच्याशी संपर्क साधावा, असे कळविण्यात आले आहे.
Comments