गुरु कृपेशिवाय भाग्योदय अशक्य: आचार्य किशोर व्यास
लातूर: मानवी जीवनांत गुरु कृपेचा लाभ झाल्याशिवाय कोणाचाही भाग्योदय होऊ शकत नाही, सामान्य नागरिकांचे सोडा पांडवांनाही या गोष्टीचा अनुभव घ्यावा लागला असे प्रतिपादन राष्ट्रसंत आचार्य किशोर व्यास यांनी केले.
महाभारत संदेश प्रवचन सप्ताहाच्या चौथ्या दिवशी, शनिवारी आचार्यांनी द्रौपदी स्वयंवरांसह अनेक विषयांवर भाष्य करून उपस्थित श्रोत्यांना मंत्रमुग्ध केले. राजा धृतराष्ट्र अंध असला तरी तो अत्यंत पाताळयंत्री स्वभावाचा असल्याचे सांगताना त्यांनी पांडवांना लाक्षागृहाच्या माध्यमातून जाळून भस्म करण्याचा कुटील डाव आखणाऱ्यांमध्ये दुर्योधन, दुःशासन, शकुनी, कर्णासह धृतराष्ट्राचाही समावेश होता, हे त्यांनी स्पष्ट केले. मात्र, पांडव स्वतः राजनितीशास्त्रात प्रवीण होते, त्यांना आपल्याला लाक्षागृहात संपवण्याचा कट असल्याचे अगोदरच समजले असल्याने ते शिताफीने तेथून बाहेर पडल्याची कथा आचार्यांनी सांगितली. केवळ एवढेच नव्हे तर लाक्षागृहाला भीमानेच आग लावून शत्रूंना आग लावण्याची संधी मिळू दिली नाही हे सांगताना आचार्यांनी सर्जिकल स्ट्राईक त्यावेळपासूनच केले जात असल्याचा पुनरुच्चार केला. छत्रपती शिवाजी महाराजांनी अफजलखानाचा वधही त्याच पद्धतीने केल्याचे त्यांनी सांगितले.
पांडव अज्ञातवासात असताना ब्राह्मण म्हणून वावरत असत. क्षत्रिय असतानाही त्यांनी अत्यंत उत्कृष्टरित्या वेदपठन कौशल्य संपादन केले होते. स्वतःवर उपनयन संस्कार करून घेतले होते हे सांगून आचार्यांनी जीवनात उपनयन संस्काराचे असलेले महत्व पटवून दिले. अर्जुनासोबत घनघोर युद्ध झालेल्या चित्ररथ गंधर्वाच्या सल्ल्यानुसार पांडवानी भौम्य महर्षींचे शिष्यत्व पत्करले व त्यानंतरच त्यांचा भाग्योदय झाला. भाग्योदयासाठी गुरुकृपा होणे अनिवार्य असल्याचे त्यांनी सांगितले. द्रौपदी स्वयंवराची कथा सांगताना आचार्य म्हणाले की, संपूर्ण महाभारतात दोनच पात्रे अशी आहेत, ज्यांच्यात कांहीही दोष आढळून येत नाही. यात द्रौपदी व विदुराचा उल्लेख त्यांनी केला. संपूर्ण महाभारतात द्रौपदीच्या तोंडून एकही अपशब्द बाहेर पडलेला नाही. देशाच्या पुरुषांच्या उत्थानासाठी महाभारत ग्रंथ अत्यंत मौलिक असल्याचे विचार व्यास यांनी प्रकट केले. कांही साहित्यिकांनी वास्तवतेचा विपर्यास करून कर्ण अत्यंत मोठा असल्याचे खोटे नमूद केल्याचे सांगताना आचार्य म्हणाले की, कर्ण अत्यंत निर्लज्ज वृत्तीचा होता. परंतु कर्णाच्या नादी लागून कांही साहित्यिकांनी त्याला महान ठरवल्याबद्दल त्यांनी तीव्र शब्दात नाराजी व्यक्त केली. तर अर्जुन महान शिवभक्त होता. तरुणांनी कसे वागावे, याचे मूर्तिमंत उदाहरण अर्जुन असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. तर आदर्श आई कशी असावी याचे उत्तम उदाहरण माता कुंती असल्याचे व्यास यांनी नमूद केले. महाभारतातील केंद्रीय पात्रे कृष्ण आणि अर्जून असल्याचे आचार्यांनी सांगितले.
कार्यक्रमाच्या प्रारंभी गोदावरीदेवी लाहोटी कन्या शाळेच्या विद्यार्थिनींनी गीतेतील बाराव्या अध्यायाचे पाठांतर सादर केले. त्यांना त्र्यंबकदास झंवर यांच्या वतीने वेदमूर्ती स्व. शंकरदेव तेरकर यांच्या स्मरणार्थ रोख पुरस्कार व त्र्यंबकदास झंवर द्वारा रचित श्रीमदभगवद्गीता ग्रंथ भेट स्वरूपात देण्यात आला. कार्यक्रमाच्या प्रारंभी श्री व सौ योगेश कर्वा यांच्या हस्ते आरती करण्यात आली. कार्यक्रमाचे संचलन सौ. कल्पना भट्टड व सौ. कुलकर्णी यांनी केले. या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी डॉ. अशोकराव कुकडे यांच्या मार्गदर्शनाखाली संस्कृती जागरण मंचचे लक्ष्मीकांत कर्वा, निलेश ठक्कर, अभिमन्यू नेत्रगावकर, विलास आराध्ये, उमेश सेलूकर, भूषण दाते, नितीन चामले, शैलेश कुलकर्णी, प्रसाद उदगीरकर, सुधीर लातुरे, रामेश्वर सोमाणी, पवन रांदड, देवेंद्र कुलकर्णी, कल्पना भट्टड, श्याम भट्टड, अमोल बनाळे, प्रा. गोपाल बाहेती, नवनाथ मद्दे, संतोष बीडकर, सतीश व्यापारी, रवी असोपा, व्यंकटराव मुंडे, डॉ. श्रीनिवास भंडे , संजय कांबळे, बापू कुंभार यांसह अनेक मान्यवर परिश्रम घेत आहेत.
छाया : श्याम भट्टड , लातूर.
Comments