लातूर: लातूर तालुक्यातील मळवटी येथील नियोजित ट्वेन्टीवन शुगर्सच्या उभारणीला गती आली आहे. सल्फरमुक्त साखरेसोबतच वीज आणि इथेनॉल निर्मितीचा हा प्रकल्प २०१८-१९ मध्ये चाचणी गाळपासाठी सज्ज होणार आहे. २०१९-२० मध्ये या कारखान्यात नियमित गळीत हंगाम सुरू होईल. आगामी वर्षात अतिरिक्त उसाची समस्या निर्माण होण्याची शक्यता असल्यामुळे माजी राज्यमंत्री आमदार अमित देशमुख यांच्या प्रेरणेतून उभा राहात असलेल्या या नवीन साखर कारखान्यामुळे जिल्ह्यातील उस उत्पादक शेतकऱ्यांची मोठी सोय होणार आहे.
कारखाना उभारणीसोबतच ऊस नोंदणीचाही कार्यक्रम हाती घेण्यात येत आहे.
अद्ययावत तंत्रज्ञानाचा वापर :
नव्याने उभारणी होत असलेला ट्वेन्टीवन शुगर्स लि. हा आजवरचा सर्वांत अद्यावत प्रकल्प असणार आहे. या प्रकल्पाची प्रतिदिन ऊस गाळप क्षमता ५ हजार मेट्रीक टन प्रस्तावित असून, सोबतच प्रस्तावित २३ मेगावॅट वीजनिर्मिती आणि इथेनॉल निर्मितीचे प्रकल्पही उभारले जाणार आहेत. सर्वांत विशेष म्हणजे येथे सल्फरमुक्त साखरेचे उत्पादन होणार आहे. अलीकडच्या काळात नव्याने विकसित झालेले तंत्रज्ञान या प्रकल्पासाठी वापरले जाणार असून प्रकल्पातील संपूर्ण यंत्रणा संगणकीकृत राहणार आहे. कमीत कमी मनुष्यबळ आणि अधिकात अधिक कार्यक्षमता हे प्रकल्पाचे वैशिष्ट्य राहणार असल्याची माहिती ट्वेन्टीवन शुगर्सच्या कार्यालयातून देण्यात आली.
४० किलोमीटरचा परिसर कार्यक्षेत्र :
मळवटी येथे उभारल्या जाणाऱ्या या प्रकल्पाचे लातूर जिल्हा हे मुख्यत्वेकरुन कार्यक्षेत्र राहील. त्यामध्ये झोनल ऑर्डरमधील तरतूदी प्रमाणे या कारखाना स्थळापासुन ४० किलोमीटरच्या परिसरातील कोणत्याही कारखान्याचे सभासद नसलेले ऊस उत्पादक शेतकऱ्यांचा ऊस तसेच जे शेतकरी इतर कारखण्याचे सभासद आहेत परंतू त्या कारखान्याच्या उपविधीच्या प्रमाणापेक्षा त्यांनी जास्तीचा उत्पादित केलेला ऊस ट्वेन्टीवन शुगर्स लि., मध्ये प्राधान्याने गाळप केला जाणार आहे. त्याचबरोबर कारखान्यापासून ४० किलोमीटर अंतरावर येणाऱ्या बीड जिल्ह्यातील अंबाजोगाई, परळी तसेच परभणी जिल्ह्यातील गंगाखेड तालुक्यातील काही गावांचाही ऊस येथे गाळपासाठी घेतला जाणार आहे. चांगले पाऊसमान झाल्यामुळे आणि हमखास उत्पादनाची हमी असल्याने यावर्षी जिल्ह्यात उसाची मोठ्या प्रमाणात लागवड झाली आहे. मांजरा नदीवर उभारण्यात आलेल्या १२ बॅरेजेसमुळे १४५ किलोमीटर नदी पात्रात पाणी थांबले आहे. परिणामी परिसरात पाण्याची पातळी वाढली आहे. पाणी उपलब्ध झाल्याने उसाची लागवड वाढत आहे.
बिगर सभासदांसाठी वरदान
ग्रामीण भागात शिक्षणाचे प्रमाण वाढलेले आहे, त्यामुळे बराच शिक्षित युवा वर्ग शेती करु लागला आहे. सूक्ष्म सिंचनासारख्या नव्या तंत्रज्ञानाचा वापर करुन कमी क्षेत्रात, कमी पाण्यात अधिक ऊस उत्पादन घेण्याचे प्रयत्न त्यांनी चालवले आहेत, ऊस लागवडही वाढली आणि एकरी उत्पादनही वाढले, त्यामुळे सध्या कार्यरत असलेल्या कारखान्यात या सर्व उसाचे गाळप होणे शक्य दिसत नाही, त्यातल्या त्यात बिगर सभासद शेतकऱ्यांची मोठी अडचण होणार आहे. बिगर सभासदांमध्ये तरुण शेतकऱ्यांचीच संख्या जास्त आहे. या बिगर सभासदांना डोळ्यासमोर ठेवून उभारल्या जात असलेला ट्वेन्टीवन शुगर्स लि., हा कारखाना युवा शेतकऱ्यांसाठी वरदान ठरणार आहे.
गंधक (सल्फर) मुक्त साखर
अलीकडच्या काळात आरोग्याच्या बाबतीत बरीच जागरुकता आली आहे. यातून सल्फरमुक्त साखरेच्या वापराबाबत विचार सुरु झाला आहे. सध्या वापरात असलेली साखर, पांढरीशुभ्र तयार व्हावी म्हणून कारखान्यात बरीच रसायने वापरली जातात. त्यात गंधकाचाही समावेश असतो, या पांढऱ्याशुभ्र साखरेबरोबर गंधकही पोटात जाते आणि त्यातून त्वचारोग तसेच पोटातील अनेक विकार बळावण्याची शक्यता असते. त्यामुळे पाश्चात्य राष्ट्रांत सल्फरमुक्त साखर वापरली जाते. मात्र त्या साखरेचा रंग पांढरा नसतो, त्यामुळे आपल्या देशात पांढऱ्याशुभ्र साखरेला पंसती आहे. लोकांच्या पसंतीचा आणि आरोग्य या दोन्ही गोष्टीचा एकत्रित विचार करुन साखर पांढरीशुभ्र राहील आणि ती सल्फरमुक्त, आरोग्यदायी असेल यादृष्टीने नव्याने संशोधन झाले आहे. हे नवे संशोधन आणि तंत्रज्ञान वापरुन आरोग्यदायी सल्फरमुक्त साखर ट्वेन्टीवन शुगर्समध्ये तयार होणार आहे.
२०१८-१९ ला चाचणी गळीत हंगाम :
सध्या वाढलेली ऊस लागवड आणि आगामी वर्षात होणारे अतिरिक्त ऊसउत्पादन लक्षात घेता ट्वेन्टीवन शुगर्स लि., ची उभारणी करण्यात येणार आहे. त्यामुळे हा कारखाना लवकरात लवकर म्हणजे अल्पावधीत उभारण्याचे प्रयत्न राहणार आहेत. अत्यंत अद्ययावत यंत्रसामुग्रीने सज्ज होणारा हा प्रकल्प ०१ वर्षाच्या आत उभा राहील. या प्रकल्पात २०१८-१९ या वर्षात चाचणी गळीत हंगाम आणि २०१९-२० या वर्षात नियमित गळीत हंगाम घेतला जाईल, असे या कारखान्याच्या कार्यालयातून सांगण्यात आले. लातूरनजीक मळवटी येथे ट्वेन्टीवन शुगर्स लि.ची उभारणी करण्याची प्रशासकीय प्रक्रिया जवळपास पूर्ण होत आली आहे. आता लवकरच प्रकल्पाचे भूमिपूजन होऊन कारखाना उभारणीच्या प्रत्यक्ष कामाला सुरुवात होणार आहे. या मोहिमेसाठी ट्वेन्टीवन शुगर्स व उस उत्पादक शेतकरी यांच्या दरम्यान विजय देशमुख (मो. ८००७७७१५६१) समन्वयकाची भूमिका पार पाडणार आहेत. उसउत्पादक शेतकऱ्यांनी आपले आधारकार्ड, जमिनीचा ७/१२ चा उतारा, ८ अ चा उतारा जोडून ऊस लागणीच्या नोंदी करण्यासाठी कारखान्याच्या कार्यालयात संपर्क (०२३८२-२२३९०१, २२३९०२) करावयाचा आहे. कारखान्यासाठी पत्र व्यवहारा करिताचा पत्ता बी ४४, एम.आय.डी.सी. लातूर येथे असून कारखाना साईट ऑफिस मळवटी, ता. जि. लातूर येथे राहणार आहे, अशी माहिती या प्रकल्पाचे मुख्य समन्वयक विजय देशमुख यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली आहे.
Comments