HOME   लातूर न्यूज

मॅराथॉनला अभूतपूर्व प्रतिसाद, जिल्हाधिकारीही स्पर्धक म्हणून धावले

स्पर्धेत महाराष्ट्रासह कर्नाटक, मध्य प्रदेश, राजस्थानच्या स्पर्धकांनीही घेतला उत्स्फूर्त सहभाग


मॅराथॉनला अभूतपूर्व प्रतिसाद, जिल्हाधिकारीही स्पर्धक म्हणून धावले

लातूर: लॉयन्स क्लब लातूर मिडटाऊनच्या वतीने रविवारी रोजी आयोजित करण्यात आलेल्या १० किलोमीटर व ५ किलोमीटर अंतराच्या हाफ मॅराथॉन स्पर्धेस अभूतपूर्व प्रतिसाद मिळाला. या स्पर्धेत केवळ महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातीलच नव्हे तर कर्नाटक, मध्य प्रदेश, राजस्थानच्या स्पर्धकांनीही उत्स्फूर्त प्रतिसाद नोंदवला. या स्पर्धेचे उद्घाटन खासदार डॉ. सुनील गायकवाड, माजी खासदार डॉ. गोपाळराव पाटील, पोलीस अधीक्षक डॉ. शिवाजीराव राठोड यांच्या हस्ते करण्यात आले.
लातूर शहरातील जिल्हा क्रीडा संकुलात रविवारी सकाळी या हाफ मॅराथॉन स्पर्धेचे उद्घाटन झाले. या स्पर्धेत दहा किलोमीटर अंतर गटांत ६०० हून अधिक तर ०५ किलोमीटर अंतर गटांत ३०० हून अधिक स्पर्धक सहभागी झाले होते. यावेळी जिल्हाधिकारी जी. श्रीकांत, अतिरिक्त पोलीस अधीक्षक काकासाहेब डोळे, शहर पोलीस उपविभागीय अधिकारी शिलवंत ढवळे, पोलीस लॉयन्स क्लब लातूर मिडटाऊनचे अध्यक्ष लॉ प्रमोद भोयरेकर, सचिव बाळासाहेब रेड्डी, तुकाराम पाटील, अनिरूध्द कुर्डूकर, अजय गोजमगुंडे, धनंजय बेंबडे, डॉ. दत्तात्रय मंदाडे, डॉ. ईरपतगिरे यांसह मान्यवर उपस्थित होते. दहा किलोमीटर धावण्याच्या स्पर्धेत पुरुष (१७ ते ४० वयोगट) प्रथम पुरस्कार बुलडना जिल्ह्यातील शिरपूर येथील किशोर गव्हाणे याने जिंकला. व्दितीय यवतमाळ जिल्ह्यातील किशोर जाधव तर तृतीय पुरस्कार वाशीमच्या प्रकाश देशमुखने जिंकला. पुरुषांच्या ४० ते ६० वयोगटात प्रथम पुरस्कार अहमदनगर येथील दत्तात्रय जायभाये, व्दितीय वाशीम भास्कर कांबळे, तृतीय पुरस्कार मुंबईच्या शिवानंद शेटे व प्रकाश अहिरेकर यांना विभागून देण्यात आला. दहा किलोमीटर धावणे महिला गटांत (वय १७ ते ४०) प्रथम पुरस्कार परभणीच्या ज्योती गवते याना, व्दितीय उदगीरच्या पूजा डिगोळे, तृतीय नांदेड जिल्ह्यातील सगरोळी येथील भारती दुधे हिला देण्यात आला. पाच किलोमीटर धावण्याच्या मुलींच्या गटांत परभणी जिल्ह्यातील कांचन म्हात्रे प्रथम, व्दितीय परभणीचे कीर्ती डुकरे, तर तृतीय पुरस्कार विशाखा बास्कर हिस देण्यात आला. पाच किलोमीटर शालेय मुलांच्या गटांत प्रथम नांदेड जिल्ह्यातील सगरोळीचा विष्णू लव्हाळे, व्दितीय परभणीच्या जयराम गोरचाटे तर तृतीय क्रमांकाचे पारितोषिक परभणीच्याच विनय धोबळे याने मिळवले. या स्पर्धेत लातूरच्या पोलीस प्रशिक्षण केंद्रातील २१० स्पर्धकांनीही पीटीएस चे बालाजी लंजीले यांचयह मार्गदर्शनाखाली सहभाग नोंदवला. या स्पर्धेसाठी मुख्य प्रायोजक म्हणून स्टेप बाय स्टेप ग्रुप एडॉल्फ जिम अविनाश चव्हाण यांचे प्रायोजकत्व लाभले.
स्पर्धेत सहभागी झालेल्या स्पर्धकांसाठी अल्पोपहाराची व्यवस्था 'खिचडी वाटप मित्रमंडळाने' केली. महावीर काळे यांचयच्या नेतृत्वाखाली यशवंत विद्दयालयाचे १०० विद्यार्थ्यांनी स्वयंसेकांची जबाबदारी सांभाळली. क्रीडा शिक्षक संघटनेचे गिरवलकर व त्यांच्या सहकाऱ्यानी स्पर्धेचे परीक्षक म्हणून काम पाहिले. स्पर्धेदरम्यान पोलीस प्रशासनाने वाहतूक नियंत्रण व्यवस्था अत्यंत चोख ठेवली होती. शहरवासियांनीही स्पर्धेच्या यशस्वीतेसाठी सर्वतोपरी सहकार्य केले. लॉयन्सच्या पदाधिकाऱ्यांनी स्पर्धेच्या यशस्वीतेसाठी सहकार्य करणाऱ्या सर्वांचे आभार व्यक्त केले.


Comments

Top