लातूर: समाजातील संत महात्मे आपल्या वाणी, आचरणातून समाजाला दिशा योग्य दिशा दाखवण्याचे कल्याणकारी कार्य निरंतरपणे करीत असतात. त्यामुळे प्रत्यक्षात चार प्रमुख व चार उपदिशा अस्तित्वात असल्या तरी सर्वोत्तम दिशा तीच असते, जी संत महात्मे दाखवत असतात, असे प्रतिपादन राष्ट्रसंत किशोरजी व्यास यांनी केले. येथील संस्कृती जागरण मंचच्या वतीने सोमवारी सकाळी डॉ. भालचंद्र रक्तपेढीच्या सभागृहात आयोजित करण्यात आलेल्या 'प्रवचनकारांचा स्वधर्म' या विषयावरील व्याख्यानात ते बोलत होते. या कार्यक्रमाच्या प्रारंभी आचार्यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करण्यात आले. डॉ. अशोकराव कुकडे यांनी उपस्थितांना आचार्य व्यास यांचा परिचय करून देतानाच आभारही व्यक्त केले. भालचंद्र रक्तपेढीच्या वतीने सत्यनारायणजी कर्वा यांनी तर पुणे जनता बँकेच्या वतीने नवनाथ मद्दे यांनी आचार्यांचे स्वागत केले. रक्तपेढीचे डॉ. एस.पी. मोरे यांनी डॉ. अशोकराव कुकडे यांचे तर किशोर पवार यांनी लक्ष्मीकांत कर्वा यांचे स्वागत केले. माळवदे यांनी अभिमन्यू नेत्रगावकर यांचे स्वागत केले. श्री श्री रविशंकर विद्यामंदिराच्या चमूने गीतेतील १५ व्या अध्यायाचे पठन केले. शशिकांत देशमुख यांनी 'संतांचिया पायी हा माझा विश्वास' हा अभंग सादर केले.
आपल्या प्रवचनात आचार्य किशोरजी व्यास पुढे म्हणाले की, आज सगळे जग नववर्ष साजरे करीत असले तरी भारतीय परंपरेने हे अर्श नवे नाही. व्यावहारिक अर्थाने उपयोगात आणले जाणारे हे नवे वर्ष आहे. भारतीय परंपरेत नववर्षाचा उपयोग प्रासंगिक केला जात असल्याचे आपण पाहतो. सनातन धर्माचे धारोष्ण प्यालेल्याना रोजचा उजाडणार दिवस नववर्ष आहे. संतवाणीचा आधार , त्यांच्याकडून मिळणारी दिशा आपल्या जीवनाचे मार्गदर्शक असतात. संत जी दिशा दाखवतात, ती कल्याणाची असते. आपण संतांचे तर संत ऋषींचे अनुसरण करत असतात. आपल्या राज्यात वारकरी, दत्त, महानुभाव, लिंगायत सांप्रदायिक समुदाय कार्यरत आहेत. या सर्व संप्रदायातील संतांनी जे सांगितले आहे, तेच सांगण्याचा प्रयत्न सर्व संप्रदायातील संतांनी वेगवेगळ्या शैलीत सांगितले आहे, असे आचार्य म्हणाले.
छाया : श्याम भट्टड, लातूर
Comments