HOME   लातूर न्यूज

वसुंधरा प्रतिष्ठानची एकदिवसीय राज्यस्तरीय पर्यावरण परिषद

'पर्यावरण, स्वच्छता अभियान, प्लास्टिकमुक्ती' वर होणार व्याख्याने


वसुंधरा प्रतिष्ठानची एकदिवसीय राज्यस्तरीय पर्यावरण परिषद

लातूर : वसुंधरा प्रतिष्ठानच्या वतीने रविवार, ०७ जानेवारी २०१८ रोजी लातूर येथे एकदिवसीय राज्यस्तरीय पर्यावरण परिषद आयोजित करण्यात आली आहे. एकूण तीन सत्रात होणाऱ्या या परिषदेत 'पर्यावरण, स्वच्छता अभियान, प्लास्टिकमुक्ती' आदी विषयांवर व्याख्याने होणार आहेत. लातुरातील भालचंद्र ब्लड बँकेच्या सभागृहात ही परिषद सकाळी १० ते सायंकाळी ५ या वेळेत होणार आहे. परिषदेचे उदघाटन नांदेडच्या स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. पंडित विद्यासागर यांच्या हस्ते होणार आहे. अध्यक्षस्थानी शिवछत्रपती शिक्षण संस्थेचे अध्यक्ष माजी खा.डॉ. गोपाळराव पाटील राहणार असून, प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हाधिकारी जी.श्रीकांत, युवा उद्योजक संगमेश्वर बोमणे, प्रा. राजाराम जाधव, प्रा. आमिर शेख आदींची उपस्थिती राहणार आहे. उदघाटन सत्रानंतर परभणी कृषी विद्यापीठाचे सहयोगी अधिष्ठाता प्राचार्य डॉ. अशोक ढवण यांचे 'पर्यावरण आणि कृषी विकास' या विषयावर व्याख्यान होणार आहे. यानंतर व्याख्यानाच्या द्वितीय सत्रात संवादतज्ज्ञ उद्धव फड यांचे 'वृक्ष, पाणी चळवळ आणि स्वच्छता अभियान : काळाची गरज' या विषयावर व्याख्यान होणार आहे. समारोप सत्रात प्रमुख पाहुणे म्हणून विद्यापीठ उपकेंद्राचे संचालक डॉ. देवेंद्रनाथ मिश्रा यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे. सहभागी विद्यार्थी, प्राध्यापकांना सहभाग प्रमाणपत्र दिले जाणार आहे, अशी माहिती वसुंधरा प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष प्रा.योगेश शर्मा, समन्वयक प्रा. दगडू शेख यांनी दिली.
परजिल्ह्यातील प्राध्यापकांसाठी ५ जानेवारी नाव नोंदणी
या परिषदेत सहभागी होण्यासाठी नावनोंदणी अर्ज भरून देणे गरजेचे आहे. नावनोंदणीस उत्तम प्रतिसाद मिळाला असून, लातूर जिल्ह्यातील प्राध्यापक, विद्यार्थ्यांची नावनोंदणी बंद करण्यात आली आहे. आता केवळ परजिल्ह्यातील प्राध्यापकानाच नावनोंदणी करता येणार असून, नावनोंदणी करण्यासाठी ९४२०४३८७१२, ९४२१५१९५६४ या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन वसुंधरा प्रतिष्ठानने केले आहे.


Comments

Top