लातूर: ०२ जानेवारी रोजी आयएमए या डॉक्टरांच्या संघटनेने घोषित केलेला १२ तासांचा संप मागे घेतला आहे. आज लोकसभेत सादर होणारे एनएमसी विधेयक डॉक्टरांच्या विरोधामुळे शासनाने स्थायी समितीकडे पाठवून त्यात सुधारणा करण्याचे ठरवले आहे. त्यामुळे हा संप मागे घेण्यात आला आहे. लातुरातील सर्व डॉक्टरांनी एकत्र येऊन या विधेयकास विरोध केला, तातडीच्या बैठकीला उपस्थित राहून विचार मंथन करुन बिलास तीव्र विरोध केला होता. या दरम्यान रुग्णांच्या गैरसोयीबद्दल दिलगिरी व्यक्त करण्यात आली आहे. अशी माहिती आयएमएचे अध्यक्ष डॉ. अशोक आरदवाड, डॉ. ओम भोसले आणि डॉ. अभय कदम यांनी दिली.
केंद्र सरकारच्या नॅशनल मेडीकल कमिशन बिलातील जाचक बदलांच्या निषेधार्थ देशभरातील वैद्यकीय व्यावसयिक मंगळवार ०२ जानेवरी रोजी सकाळी सहा ते सायंकाळी असे बारा तास संपावर गेले होते. मात्र अत्यावश्यक रुग्णसेवा सुरु ठेवण्यात आल्या होत्या. केंद्र सरकारच्या वतीने नॅशनल मेडीकल कमिशन बिलांतर्गत मोठे फेरबदल केले जाणार होते. त्याय डॉक्टरांचे प्रतिनिधी घटवून शासन नियुक्त प्रतिनिधी वाढवण्यात येणार होते. वैद्यकीय महाविद्यालयांना मान्यता देतानाही चुकीची धोरणे राबवली जाण्याची शक्यता होती. त्यासोबतच नीटसारख्या समाईक परिक्षातही मोठे फेरबदल होण्याची भिती व्यक्त केली जात होती. याचा त्रास वैद्यकीय व्यावसायिकांसह विद्यार्थ्यांनाही झाला असता असे आयएमएचे म्हणणे होते.
Comments