लातूर: येथील संतोष शेट्टी या तरुणाचे शुक्रवारी निधन झाले. मृत्यूनंतर शोक करीत बसण्यापेक्षा कुटुंबियांना स्व. संतोष याचा देह जिल्हा शासकीय वैद्यकिय महाविद्यालयास दान करण्याचा निर्णय घेतला. या माध्यमातून कुटुंबियांनी समाजापुढे आदर्श ठेवला. विशेषतः समाजातील तरुणांमध्ये अवयवदान व देहदान ही मोहिम रुजली जावी याकरिता हा निर्णय अतिशय मार्गदर्श ठरला आहे.
संतोष शेट्टी या तरुणाचा शुक्रवारी मृत्यू झाला. सामाजिक कार्यात नेहमी अग्रभागी असणारा हा तरुण मृत्यूनंतर आपण देहदान करु असे नेहमी म्हणायचा. दुर्देवाने त्याचा मृत्यू झाल्यानंतर कुटुंबियांनी त्याची ती इच्छा पूर्ण करण्याचा निर्णय घेतला. काळजावर दगड ठेवत आणि स्वतःचे दुःख बाजूला सारुन वैद्यकिय शिक्षण घेणार्या विद्यार्थ्यांना त्याचा लाभ व्हावा हा विचार त्यांनी केला. स्व. संतोष यांचे जेष्ठ बंधू बालाजी शेट्टी हे नांदेड येथील गुरु गोविंदसिंह महाविद्यालयात प्राध्यापक आहेत. देहदान व अवयवदानाबाबत तरुणांना जागृत करण्याचे काम ते करतात. त्यांनीही स्वतःच्या मृत्यू पश्चात देहदान करण्याचा संकल्प केला आहे. स्व. संतोष यांच्या पश्चात आई-वडील, एक भाऊ, पाच बहिणी असा परिवार आहे. स्व. संतोष याचा आदर्श घेऊन तरुणांनी देहदान व अवयवदानाचा संकल्प करावा यातून अनेकांचे प्राण वाचू शकतात असे मत यावेळी उपस्थितांनी व्यक्त केले.
Comments