लातूर: मागच्या ३० वर्षापासून लातूर येथे असलेले मांजरा धरणाच्या डाव्या कालव्याचे उपविभागीय कार्यालय अंबाजोगाई येथे हलविण्याचा घाट शासनाने घातला आहे. ही कार्यवाही तातडीने थांबवून सदरील कार्यालय लातूर येथेच राहील अशी व्यवस्था करावी, अशी मागणी आमदार अमित विलासराव देशमुख यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडनवीस व जलसंपदा मंत्री गिरीष महाजन यांच्याकडे एका निवेदनाव्दारे केली आहे. आमदार देशमुख यांनी मुख्यमंत्री यांना पाठविलेल्या या निवेदनात पुढे म्हटले आहे की, मांजरा धरण आणि त्या धरणाचे कालवे लातूर जिल्ह्याच्या दृष्टीने जिव्हाळ्याचा विषय आहे. धरणाच्या डाव्या कालव्याच्या एकूण ९० किलोमीटर लांबीपैकी ६० किलोमीटर लांबी लातूर आणि रेणापूर तालुक्यात आहे, उर्वरित फक्त ३० किलोमीटर लांबी केज व अंबाजोगाई तालुक्यात येते. केज व अंबाजोगाई तालुक्यातील लाभधारक शेतकऱ्यांच्या सिंचन व्यवस्थापनासाठी आवश्यक अशी शाखा कार्यालये धनगाव ता. केज व पाटोदा ता. अंबोजागाई येथे कार्यरत असून त्यांच्यामार्फत अत्यंत व्यवस्थितपणे सिंचन व्यवस्थापनाचे काम पाहिले जाते. त्यामुळे या कारणासाठी उपविभागीय कार्यालयच अंबाजोगाई येथे घेऊन जाणे गरजेचे ठरत नाही. सर्वात महत्त्वाचे म्हणजे लातूर शहर आणि लातूर एमआयडीसी पाणी पुरवठयाचे व्यवस्थापनही याच कार्यालयातून होते. शिवाय या कार्यालयाशी संबंधित इतर कार्यालये ही लातूर येथेच आहेत, त्यामुळे सर्वांच्या सोईच्या दृष्टीने हे कार्यालय लातूर येथे असताना विनाकारण अंबाजोगाईला हलविण्याचा घाट घातला जात आहे. ते त्वरीत थांबविणे आवश्यक आहे.
लोकनेते विलासराव देशमुख साहेब राज्याचे मंत्री आणि नंतर मुख्यमंत्री म्हणून काम करीत होते तेंव्हा त्यांनी अनेक शासकीय कार्यालये लातूरात आणली. तालुका आणि जिल्हास्तरावरीलच नव्हे तर विभागीय कार्यालयेही लातूर येथे सुरु करुन या भागातील लोकांची त्यांनी सोय केली. लातूर शहराचा दर्जा वाढवला, सत्ता बदलल्यानंतर मात्र नेमकी उलट परिस्थिती होत आहे.
वास्तविक पाहता संबंधित कार्यालय लातूर येथेच राहणे कामकाजाच्या दृष्टीने योग्य असल्याचा अहवाल पाटबंधारे विभागाने दिलेला आहे. त्यामुळे हे कार्यालय इतरत्र हलविणे कोणत्याही दृष्टीने योग्य ठरत नाही. त्यामुळे जलसंपदा मंत्री आणि मुख्यमंत्री यांनी या प्रकरणी लक्ष घालून हे स्थलांतर थांबवावे, असेही आमदार देशमुख यांनी निवेदनाच्या शेवटी म्हटले आहे. या निवेदनाच्या प्रती ग्रामीण विकास मंत्री पंकजाताई मुंडे व लातूरचे पालकमंत्री संभाजी पाटील निलंगेकर यांनाही पाठवल्या आहेत. स्वत: पंकजा मुंडे याच कार्यालयाच्या स्थलांतराबाबत फेरविचार करतील शिवाय हे कार्यालय लातूर येथून अंबाजोगाईला स्थलांतर करण्याचा निर्णय रद्द करुन घेण्यासाठी पालकमंत्री संभाजी पाटील निलंगेकर पुढाकार घेतील अशी अपेक्षा असल्याची आमदार देशमुख यांनी या निवेदनात नमूद केलेले आहे.
Comments