लातूर: अखिल भारतीय लिंगायत समन्वय समितीच्या महाराष्ट्र राज्य समन्वयकपदी माधवराव पाटील टाकळीकर यांची नियुक्ती करण्यात आली असल्याची माहिती समितीचे केंद्रीय निमंत्रक अविनाश भोसीकर यांनी शनिवारी लातुरात पत्रकार परिषदेत बोलतांना दिली. लिंगायत धर्माच्या संवैधानिक मान्यतेसाठी लोकशाही मार्गाने लढा दिला जात आहे. महाराष्ट्र राज्यासह देशातील विविध प्रांतातही हा लढा अधिक तीव्र केला जाणार आहे. राज्यातील लढ्याला आणखी गती देण्याच्या उद्देशाने राजकीय तसेच सामाजिक क्षेत्रात अग्रेसर असलेल्या माधवराव पाटील टाकळीकर यांची राज्याच्या समन्वयकपदी नियुक्ती करण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे भोसीकर यांनी यावेळी सांगितले. समितीच्या प्रवक्तेपदी प्रा. राजेश विभूते, राजशेखर तंबाखे, प्रा. सच्चीदानंद बिच्चेवार, प्रा. भीमराव पाटील, यांची नियुक्ती करण्यात आली असल्याचेही भोसीकर यांनी सांगितले. लिंगायत समन्वय समितीत देशभरातील लिंगायतांच्या ६० पेक्षा अधिक संघटनांचा समावेश आहे. लिंगायत समन्वय समितीच्या मोर्चाची दखल घेऊन कर्नाटक सरकारने सात सदस्यांची समिती गठीत केली असून महाराष्ट्र सरकारने अद्याप समितीच्या मोर्चाची दखल घेतलेली नाही. नजिकच्या काळात मुंबईतही महामोर्चा काढण्यात येईल असेही त्यांनी सांगितले. यावेळी प्रा. राजेश विभूते, बाबासाहेब कोरे, विश्वनाथ निगुडगे, सौ. ललिताताई पांढरे, शिवदास लखादिवे, सुनील हेंगणे, बालाजी पिंपळे, सोनू डगवाले आदी मान्यवर उपस्थित होते.
Comments