लातूर: लातूर तालुक्यातील मळवटी येथे ट्वेंटीवन शुगर्सची उभारणी होणार हे जाहीर होताच शेतकरी वर्गामध्ये आंनदाचे वातावरण पसरले असून या नियोजित कारखान्याच्या ऊस नोंदणी प्रक्रियेला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. लातूर जिल्ह्यातील मांजरा परिवारातील साखर कारखानदारी देशात आणि राज्यात आदर्श ठरली आहे. या कारखान्यांबद्दल शेतकऱ्यांमध्ये विश्वासाचे वातावरण आहे. ऊस लागवडीचे वाढते प्रमाण लक्षात घेता अतिरिक्त ऊसाची समस्या निर्माण होईल अशी भिती शेतकरी वर्गामध्ये निर्माण झाली होती. नेमक्या याच काळात ट्वेंटीवन शुगर्सची उभारणी जाहीर झाल्याने शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. ट्वेंटीवन शुगर्सचे लातूर जिल्हा हे कार्यक्षेत्र असले तरी मळवटीपासून ४० किलोमीटर अंतरातील शेतकऱ्यांचा ऊस येथे गाळपास घेतला जाणार आहे. त्यामुळे लातूर जिल्ह्यासह अंबाजोगाई, परळी या तालुक्यातीलही काही गावातील शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे. ट्वेंटीवन शुगर्सच्या उभारणीची घोषणा होताच लातूर जिल्ह्यासह अंबाजोगाई, परळी या तालुक्यातील ४० किलोमीटरच्या अंतरात येणाऱ्या गावा-गावामधून गाड्या भरुन शेतकरी लातूरात येऊन ऊस नोंदणी करीत आहेत. त्यामुळे कारखान्याचे संपर्क कार्यालय मागच्या सात दिवसापासून गर्दीने फुलून गेले आहे. कोणत्याही कारखान्याचे सभासद नसलेल्या शेतकऱ्यांचा तसेच इतर कारखान्याचे सभासद आहेत, परंतू त्यांनी अतिरिक्त ऊस उत्पादीत केला आहे, त्यांचा ऊस ट्वेंटीवन शुगर्समध्ये गाळप केला जाणार असल्याचे जाहीर केले आहे. त्यामुळे आपला ऊस गाळप होणार याचा विश्वास शेतकऱ्यांमध्ये निर्माण झाला आहे. २०१८-१९ च्या गळीत हंगामात ट्वेंटीवन शुगर्सचा चाचणी गळीत हंगाम होण्याचे नियोजन असून २०१९-२० मध्ये नियमित गाळप केले जाणार आहे. या कारखान्याची उभारणी अद्यायावत यंत्रसामुग्रीतून होणार असून ऊस नोंदणीपासून गाळपापर्यंतची संपूर्ण प्रक्रिया संगणकीकृत राहणार आहे. या कारखान्यात आरोग्यास उपयुक्त ठरणारी सल्फरमुक्त साखर उत्पादीत होणार असून येथे प्रारंभापासुनच इथेनॉल व को-जन प्रकल्पही सुरु होणार आहेत. अगदी योग्य वेळी शेतकऱ्यांच्या मदतीला आलेला आणि अद्यायावत पद्धतीने उभारल्या जाणाऱ्या या साखर कारखान्याच्या संपर्क कार्यालयात सात दिवसात हजारो शेतकरी ऊस नोंदणी करत आहेत. शेअर्सची नोंदणी कधी सुरु होणार अशी विचारणा होत असून या शेअर्सची किंमत किती असेल अशी मोठी उत्सुकता शेतकऱ्यांमध्ये आहे. जिल्हाभरात त्याबाबत उत्सुकतेने चर्चा होताना दिसत आहे.
Comments