HOME   लातूर न्यूज

जिल्हा परिषद उपाध्यक्ष रामचंद्र तिरुके यांनी घेतला विद्यार्थ्यांचा तास

कोळपा शाळेस तिरुके गुरुजींची अचानक भेट, कथा ऐकल्या आणि ऐकवल्या


जिल्हा परिषद उपाध्यक्ष रामचंद्र तिरुके यांनी घेतला विद्यार्थ्यांचा तास

लातूर: जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष तथा शिक्षण सभापती रामचंद्र तिरुके यांनी मंगळवारी तालूक्यातील कोळपा येथील जिल्हा परिषदेच्या शाळेस अचानक भेट देऊन पाहणी केली. यावेळी शाळेतील पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना एकत्र करुन त्यांचा तास घेतला. पाढे, गणित, हस्ताक्षर यासह विद्यार्थ्यांना कथा सांगायला लावल्या. स्वतःही कथा सांगून त्यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. तिरुके यांनी दुपारच्या वेळेस कोळपा येथे शाळेत प्रवेश केला. शाळेमधील विद्यार्थी व शिक्षक स्नेहसंमेलनाची तयारी करत होते. शाळेसमोरील मोकळया जागेत काही वर्ग सुरु होते. उपाध्यक्षांना शाळेच्या आवारात प्रवेश करताना पाहून शिक्षक आनंदी झाले. शिक्षकांनी विद्यार्थ्यांना उपाध्यक्ष तिरुके यांचा परिचय करुन दिला. यावेळी औपचारिक कार्यक्रमाला फाटा देत रामचंद्र तिरुके सरळ विद्यार्थ्यांकडे गेले. कोळपा येथे इयत्ता पहिली ते आठवीचे वर्ग चालतात. शाळेची पटसंख्या १४६ एवढी आहे. यावेळी उपस्थित विद्यार्थ्यांना एकत्रित करण्यात आले. विद्यार्थ्यांच्या जवळ जावून तिरुके यांनी त्यांना पाढे म्हणायला लावले. कांही विद्यार्थ्यांना भागाकाराची गणिते करायला सांगितली. विद्यार्थ्यांचे हस्ताक्षरही तपासले. विशिष्ट शब्द देऊन त्यावरुन कथा तयार करा असेही त्यांनी विद्यार्थ्यांना सांगितले. अनेक विद्यार्थ्यांनी तिरुके यांनी विचारलेल्या प्रश्‍नांना मोकळेपणाने उत्तरे दिली. जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष आपल्यात सहभागी होऊन आपल्याशी बोलत आहेत. याचा आनंद विद्यार्थ्यांच्या चेहर्‍यावर दिसून येत होता.


Comments

Top