HOME   लातूर न्यूज

संघर्ष टाळण्यासाठी समन्वय हवा- सरकार्यवाह भैय्याजी जोशी

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या‘माधव स्मृती’ या नूतन वास्तूचे लोकार्पण


संघर्ष टाळण्यासाठी समन्वय हवा- सरकार्यवाह भैय्याजी जोशी

लातूर: आपल्या देशात जातींचा प्रश्‍न हा पूर्वी सामाजिक होता. परंतू राजकीय पक्षांनी जातीचे राजकारण सुरु केल्यानंतर तो प्रश्‍न आता राजकीय झाला आहे आणि त्यामुळेच हा प्रश्‍न सोडविण्यासाठी उपलब्ध असणारे सर्व दरवाजे बंद झाले आहेत. सध्या या प्रश्‍नांमुळे निर्माण होणारी संकटे तात्कालीक असून त्यातूनही मार्ग निघू शकतो. हा संघर्ष टाळण्यासाठी समन्वय हवा आहे असे मत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरकार्यवाह सुरेशजी उर्फ भैय्याजी जोशी यांनी व्यक्त केले. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या ‘माधव स्मृती’ या नूतन वास्तुच्या लोकार्पण सोहळयात सरकार्यवाह भैय्याजी जोशी बोलत होते. मंचावर देवगिरी प्रांत संघचालक गंगाधर तथा दादा पवार, लातूर विभाग संघचालक व्यंकटसिंह तथा अण्णा चव्हाण, जिल्हा संघचालक संजय अग्रवाल आणि लोकसेवा मंडळाचे अध्यक्ष विश्‍वनाथराव जाधव यांची उपस्थिती होती. प्रारंभी संघगितांची राष्ट्रवंदना देण्यात आली. लोकसेवा मंडळाच्या वतीने उपस्थित मान्यवरांचे स्वागत करण्यात आले. मान्यवरांनी भारतमातेच्या प्रतिमेस पुष्प अर्पण केले. सरकार्यवाही भैय्याजी जोशी यांच्या हस्ते वास्तूच्या फलकाचे अनावरण करण्यात आले. लोकसेवा मंडळाचे कार्यवाही सुनिल मुचवाड यांनी प्रास्ताविकात माधव स्मृती ही इमारत उभारण्याकामी झालेल्या कार्याचा आढावा सादर केला. वास्तू उभारणीसाठी मदत करणारे अभय देशमुख, राहूल देशपांडे, सारंग आयचित, सुभाष मरडे, राजु ढोबाळे, सुनिल गिरी, हरिभान मोरे यांचा सत्कार करण्यात आला. विवेक आयचित, अभय देशमुख, राहूल देशपांडे यांनी बांधकाम करताना आलेले अनुभव कथन केले. शशी देशमुख यांनी कोटी मनांचे अमृत सागर हे वैयक्तीक गीत सादर केले. पसायदानाने कार्यक्रमाची सांगता झाली. या कार्यक्रमास सामाजिक व राजकीय क्षेत्रातील मान्यवरांसह संघाचे प्रचारक व स्वयंसेवकांची मोठया संख्येने उपस्थिती होती.


Comments

Top