अहमदपूर: सहकार क्षेत्रातून सामान्य जनतेचा विकास होणे अपेक्षित आहे परंतू सहकारी क्षेत्रातील कारखानदार शेतकर्यांना भिती दाखवून सुडाचे राजकारण करीत आहेत. यातून शेतकर्यांचे नुकसान होत आहे. सहकार क्षेत्र टिकले पाहिजे यासाठी सर्वांनी एकत्रित काम करण्याची गरज आहे. परंतू कांही मंडळीकडून सुडाचे राजकारण सुरु असून ते थांबले पाहिजे असे मत पालकमंत्री संभाजीराव पाटील निलंगेकर यांनी व्यक्त केले. अहमदपूर येथील जिल्हा परिषद शिक्षक सहकारी पतसंस्थेच्या नूतन वास्तू उद्घाटन समारंभात पालकमंत्री निलंगेकर बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आ. विनायकराव पाटील तर व्यासपिठावर माजी आ. बब्रुवान खंदाडे, जि.प.चे अध्यक्ष मिलिंद लातूरे, उपाध्यक्ष रामचंद्र तिरुके, भाजपाचे जिल्हाध्यक्ष नागनाथ निडवदे, प्रकाश देशमुख, बजरंग जाधव, सदस्य सुधाकर शृंगारे, प्रदेश प्रक्वते गणेश हाके, भारत चामे, अशोक केंद्रे, पंचायत समितीच्या सभापती अयोध्या केंद्रे, नगराध्यक्षा अश्विनी कासनाळे, आदिंची उपस्थिती होती. यावेळी बोलताना पालकमंत्री म्हणाले की, सहकारी कारखानदाराकडून शेतकर्यांचा ऊस नेण्याऐवजी राजकारण केले जात आहे. आमच्याशिवाय पर्याय नाही अशी भाषा वापरली जात असून ती चुकीची आहे. अशी भाषा चालणार नाही अशी सूचना आपण देत आहोत. कोणालाही शेतकर्यावर अन्याय करण्याचा अधिकार नाही. सहकारातून हित जोपासले जाणे आवश्यक आहे. परंतू कांही मंडळी सहकार क्षेत्रातील बँका व कारखाने बंद करुन खाजगी कारखाने उभारत आहेत. शेतकर्यांच्या जिवावर कारखाने चालवून त्यांच्यावरच अन्याय केला जात आहे. यापुढे हे चालणार नाही असेही ते म्हणाले. केंद्र व राज्य सरकारच्या माध्यमातून केवळ आणि केवळ विकासाचे राजकारण होत असून जिल्ह्यात आगामी काळात सुडाचे राजकारण खपून घेतले जाणार नाही असा इशारा यावेळी पालकमंत्री निलंगेकरांनी दिला.
अध्यक्षीय समारोपात आ. विनायकराव पाटील यांनी आपण शिक्षकांच्या पाठीशी असल्याचे सांगितले. उद्घाटन सोहळा पार पडल्यानंतर पालकमंत्री निलंगेकर यांच्या हस्ते इमारतीच्या आवारात वृक्षारोपण करण्यात आले. प्रारंभी पतसंस्थेच्या वतीने उपस्थित मान्यवरांचा सत्कार करण्यात आला. पतसंस्थेचे अध्यक्ष रणजित चौधरी यांनी कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात पतसंस्थेची माहिती दिली. पदाधिकार्याची यथोचित भाषणे झाली. या कार्यक्रमास पतसंस्थेचे सभासद व नागरिकांची मोठया संख्येने उपस्थिती होती.
Comments