लातूर: येथील मुलांच्या निरीक्षण व बालगृहातील अनाथ मुलांना स्वतःच्या हाताने तीळगूळ भरवून खासदार डॉ. सुनील गायकवाड यांनी मकर सक्रांतीचा सणाचा आनंद द्वीगुणीत केला. लेबर कॉलनीजवळील मुलांचे निरीक्षण गृह व बालगृहात जावून खासदार डॉ. सुनील गायकवाड यांनी तेथील मुलांसोबत गप्पा मारल्या. त्यांच्या समस्या ऐकून घेतल्या. सर्व मुलांना त्यांच्या हाताने तीळगूळ भरवले. यावेळी आयोजित कार्यक्रमास निरीक्षण गृहाचे सचिव अॅड. विक्रम हिप्परकर, जिल्हा महिला व बालविकास अधिकारी वैभव सूर्यवंशी, विलासराव देशमुख मांजरा सहकारी साखर कारखान्याचे संचालक रवींद्र काळे, कारसा गावचे माजी सरपंच लालासाहेब सय्यद, संस्थेचे अधीक्षक अरविंद थोरात, हरिभाऊ गायकवाड, गायत्री नल्ले, अभय हिप्परकर, बाल कल्याण समिती अध्यक्षा शिला दंडे, सदस्या सुधा कांबळे यांची उपस्थिती होती. यावेळी डॉ. गायकवाड म्हणाले, अनाथ मुलांना मायेचे पांघरूण देण्याचे काम मागील अनेक वर्षांपासून अॅड. हिप्परकर हे सामाजिक बांधिलकीतून करीत आहेत. त्यांच्या कार्यामुळे या मुलांना जगण्याची जिद्द मिळत आहे. या मुलांचे करिअर घडत आहे. उपेक्षित समाजाला आधार देण्याचे काम मागील अनेक वर्षांपासून मी करीत आहे. निवडणुकीपुरते राजकारण व उर्वरित वेळेत समाजकारण करण्याची माझ्या वडिलांची शिकवण आहे. लातूरचा आदर्श राजकीय वारसा पुढे घेऊन जाण्याचे काम आजपर्यंत केले आहे. यापुढेही ते सुरूच राहणार आहे. या संस्थेला माजी केंद्रीय गृहमंत्री शिवराज पाटील-चाकूरकर व लोकनेते विलासराव देशमुख यांनी निधी दिला. माझ्याकडूनही संस्थेच्या उर्वरित इमारत बांधकामासाठी ११ लाख रुपयांचा निधी देणार असल्याची घोषणा त्यांनी यावेळी केली. यापुढील काळात पालकाच्या भूमिकेत येथील मुलांसोबत सदैव राहणार असल्याचे आश्वासनही त्यांनी यावेळी दिले.
Comments