HOME   लातूर न्यूज

कव्हेकर परिवाराने लुटले सामाजिकतेचे वाण

हळदी-कुंकूवातून बेटी बचाव व पर्यावरण रक्षणाचा संदेश


कव्हेकर परिवाराने लुटले सामाजिकतेचे वाण

लातूर: सध्या मकर संक्रांतीनिमित्त हळदी-कुंकूवाची धूम सुरु आहे. संक्रांतीच्या हळदी-कुंकूवानिमित्त महिला एकमेकांनी वाण देतात. हे वाण देताना राजकीय व सामाजिक पार्श्वभूमी असणार्‍या कव्हेकर परिवाराने सामाजिक भान जपत पर्यावरण रक्षण व बेटी बचावचा संदेश दिला आहे. यासह प्लास्टीक मुक्ती व कचरा वर्गीकरणाचा संदेश देत महिलांच्या आरोग्याकडे लक्ष देण्यासाठी आरोग्य तपासणी शिबीरही घेतले. घरोघर जाऊन हळदी-कुंकू देणार्‍या व घेणार्‍या महिलांची लगबग सुरु आहे. अनेक ठिकाणी महिला एकत्रितपणे हळदी-कुंकूवाचे कार्यक्रम घेत आहेत. माजी आ. शिवाजीराव पाटील कव्हेकर, जिल्हा परिषदेच्या च्या माजी अध्यक्षा प्रतिभाताई पाटील कव्हेकर, नगरसेवक अजित पाटील यांच्यासह संपूर्ण परिवार व पतंजली मेगा स्टोअरचे विष्णु भुतडा यांनी हळदी-कुंकूवाचा हा कार्यक्रम आगळा-वेगळा करण्याचा निर्णय घेतला. सामाजिक प्रश्नांची जाण ठेवत येणार्‍या महिलांना प्लास्टीक मुक्तीचा संदेश देण्यासाठी कापडी पिशव्यांचे वाटप करण्यात आले. नगरसेवक तथा जेएसपीएमचे कार्यकारी संचालक अजित पाटील यांनी स्वखर्चाने हळदी-कुंकूवासाठी आलेल्या सुमारे ३००० महिलांना कापडी पिशव्यांचे वाटप केले. या हळदी-कुंकूवाच्या कार्यक्रमाचे व मेळाव्याचे उद्घाटन सौ. प्रतिभाताई पाटील कव्हेकर यांच्या हस्ते संपन्न झाले. यावेळी नगरसेवक अजित पाटील, उपकार्यकारी संचालक रणजित पाटील, पतजंलीचे प्रदेशाध्यक्ष विष्णू भुतडा, पतजंली मेगा स्टोअरच्या संचालिका सौ. चंदन भुतडा, जनाधार संस्थेचे प्रमुख संजय कांबळे, गोपी साठे, आयुर्वेदिक डॉ. व्यंकट सिध्देश्वरे, डॉ. वंदना कानडे, भारत स्वाभिमानचे राम घाडगे आदिंची उपस्थिती होती. अपौचारिक कार्यक्रमात सौ. कव्हेकर यांनी महिलांची भूमिका विषद केली. समाजात वावरताना आपली कर्तव्य तसेच जबाबदारी पार पाडण्याचे आवाहन करुन स्वच्छतेमध्ये महिलांची भूमिका महत्वाचे असल्याचे त्या म्हणाल्या. नगरसेवक अजित पाटील यांनी कापडी पिशवी वापरुन प्लास्टीकचा वापर बंद करावा, ओला व सुका कचरा वेगळा करुन द्यावा, पाण्याचा दुरुपयोग टाळावा तसेच प्रभागातील प्रत्येक नागरीकांचे आरोग्य सुरक्षित रहावे यासाठी सर्वांनी स्वच्छतेचा संकल्प करण्याचे आवाहन केले. यावेळी जनाधार संस्थेचे संजय कांबळे, गोपी साठे व पतजंलीचे विष्णु भुतडा यांचीही भाषणे झाली. डॉ. सिध्देश्वरे व डॉ. कानडे यांनी उपस्थित महिलांची आरोग्य तपासणी केली. मुख्याध्यापक गोविंद शिंदे व संजय बिराजदार यांच्यासह जेएसपीएम संस्थेच्या कर्मचार्‍यांनी हा उपक्रम यशस्वी करण्यासाठी परिश्रम घेतले.


Comments

Top