लातूर: आत्महत्याग्रस्त शेतकर्यांचे वारस तसेच राष्ट्रीय कुटुंब अर्थसहाय्य योजनेअंतर्गत लाभार्थ्यांना पालकमंत्री संभाजीराव पाटील निलंगेकर यांच्या हस्ते धनादेशाचे वितरण करण्यात आले.
शिरुर अनंतपाळ तहसिल कार्यालयात हा कार्यक्रम झाला. तालुक्यातील ०६ लाभार्थ्यांना यावेळी धनादेश देण्यात आले. शिरुर अनंतपाळ तालुक्यातील येरोळ येथील आत्महत्याग्रस्त शेतकर्यांचे वारस कविता बाहुबली कासार यांना ०१ लाख रुपयांचा धनादेश पालकमंत्र्यांच्या हस्ते देण्यात आला. याच कार्यक्रमात राष्ट्रीय कुटुंब अर्थसहाय्य योजने अंतर्गत पाच कुटुंबांना प्रत्येकी २० हजार रुपये मदतीचे धनादेश पालकमंत्र्यांनी वितरीत केले. या पाच कुटुंबामध्ये पांढरवाडी येथील फुलाबाई कचरु कांबळे, येरोळ येथील कविता बाहूबली कासार, दैठणा येथील ज्योत्स्ना सोपान कांबळे, साकोळ येथील मधुबाला प्रताप शिंदे आणि घुग्गी सांगवी येथील सोनाबाई उध्दव राठोड यांचा समावेश आहे. या सर्वांना पालकमंत्र्यांनी मदतीचे धनादेश वितरीत केले. याप्रसंगी पालकमंत्री निलंगेकर यांनी केंद्र व राज्य सरकार शेतकरी हिताला प्राधान्य देत असल्याचे सांगून अडचणीत असलेल्या शेतकर्यांना मदत करण्यास सरकार तत्पर आहे. सरकारच्या वतीने कोणत्याही परिस्थितीत शेतकर्यांना वार्यावर सोडले जाणार नाही अशी ग्वाही देऊन आगामी काळात शेतकर्यांसाठी अधिक हिताच्या योजना कशा प्रकारे अंमलात आणला येतील यावर विचारमंथन चालू असल्याचे सांगितले. शेतकर्यांनी आत्महत्या करु नये असे आवाहन करुन आत्महत्याग्रस्त शेतकर्यांच्या परिवाराला पुन्हा नव्याने जगण्याचे बळ देण्यासाठी वेगवेगळया योजना सुरु केलेल्या आहेत. त्याच बरोबर त्यांच्या पाल्यांचे भविष्य उज्वल व्हावे याकरिता शिक्षणाची जबाबदारीही घेण्याचा मानस यावेळी पालकमंत्री संभाजीराव पाटील निलंगेकर यांनी व्यक्त केला. या प्रसंगी जिल्हा परिषद अध्यक्ष मिलिंद लातूरे, उपाध्यक्ष रामचंद्र तिरुके, भाजपा जिल्हाध्यक्ष नागनाथ निडवदे, सभापती संजय दोरवे, शिरुर अनंतपाळ पंचायत समिती सभापती, तहसीलदार शृंगारे आदींसह शिरुर अनंतपाळ येथील लोकप्रतिनिधी, पक्ष पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Comments