लातूर: लातूर जिल्हा माहिती कार्यालयाने जिल्हा वार्षिक योजना सन २०१७-१८ (सर्वसाधारण) अंतर्गत जिल्ह्यातील ७० गावांमध्ये विविध शासकीय योजनांची चित्ररथाच्या माध्यमातून प्रसिध्दी करण्यासाठी चित्ररथ तयार केला आहे. जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात या चित्ररथास जिल्हाधिकारी जी. श्रीकांत यांनी हिरवी झेंडी दाखवून प्रसिध्दी मोहिमेचा शुभारंभ केला. यावेळी जिल्हा माहिती अधिकारी सुनील सोनटक्के उपस्थित होते. जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून जिल्हा वार्षिक योजनेंतर्गत जिल्ह्यातील नागरिकांना शासकीय योजनांची माहिती व्हावी याकरिता चित्ररथ जिल्हा माहिती कार्यालयाने तयार केला असून या माध्यमातुन बॅनर्स व ऑडिओ जिंगल्सद्वारे शासकीय योजनांची जिल्ह्यातील ७० गावांमध्ये जाऊन माहिती देण्यात येणार आहे. याअंतर्गत जलयुक्त शिवार अभियान, प्रमोद महाजन कौशल्य व उद्योजकता विकास, हगणदारी मुक्त अभियान या योजनाबरोबरच इतर विविध योजनांची माहिती ऑडिओ जिंगल्सद्वारे या चित्ररथातून दिली जाणार आहे. यावेळी माहिती कार्यालयाचे कैलास लांडगे, अश्रुबा सोनवणे, मोहन कोळी, सी. पी. आराध्ये उपस्थित होते.
Comments