लातूर: कालच्या पहाटे किंवा परवाच्या रात्री चोरट्यांनी लातूर माहापालिकेच्या तिजोरीवर डल्ला मारला. चोरुन नेलेल्या तिजोरीत काहीच नव्हतं. उचलता न येणार्या, न फुटलेल्या तिजोरीत मोठी रक्कम होती ती वाचली. या पार्श्वभूमीवर दोन वॉचमनना निलंबित करण्यात आले पण महापौरांची भूमिका काय, असे प्रकार टाळण्यासाठी महापौरांनी काय ठरवलंय हे लोकांपर्यंत जावे म्हणून आम्ही महानगरपालिकेत एक तास घालवला पण काहीच हाती लागले नाही! या प्रकरणावर मी काही बोलणार नाही. आमचे प्रवक्ते शैलेश स्वामी बोलतील असं महापौरांनी स्पष्ट सांगितलं. शहराचे प्रथम नागरिक म्हणून मनपाचे प्रमुख कारभारी म्हणून लोकांना महापौरांच्या बोलण्याची अपेक्षा असते. विषय इतका गंभीर असल्याने महापौर काय सांगतात याकडे शहराचे लक्ष असते हे आम्ही समजाऊन सांगण्याचा प्रयत्न केला. पण उपयोग झाला नाही. एका हाकेत शैलेश स्वामी हजर झाले खरे पण आम्ही त्यांना रामराम ठोकून आमच्या कामाला निघून गेलो! मुख्यमंत्र्यांचा प्रवक्ता कधी बोलतो का? जिल्हा परिषद अध्यक्षांचा प्रवक्ता कधी बोलतो का? जिल्हा बॅंकेच्या अध्यक्षांचा प्रवक्ता कधी बोलतो का? बाजार समितीच्या सभापतींचा प्रवक्ता कधी बोलतो का? असे अनेक प्रश्न आमच्या मनात घोळत होते!
Comments