लातूर: भारतीय लोकशाहीच्या बळकटीकरणासाठी भावी व नवीन मतदाराला निवडणूक प्रक्रिया व निवडणूक आयोगाच्या कार्यपध्दतीची माहिती देऊन त्यांचा निवडणूक प्रक्रियेत सहभाग वाढवून निवडणूक साक्षर करण्यासाठी प्रयत्न केले जाणार आहेत. जिल्हयातील जास्तीत जास्त शाळा व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी निवडणूक साक्षर होण्याचे आवाहन जिल्हाधिकारी जी. श्रीकांत यांनी केले. जिल्हा निवडणूक कार्यालयाच्या वतीने पुरणमल लाहोटी शासकीय तंत्रनिकेतन मध्ये निवडणूक साक्षरता क्लबची स्थापना करण्यात आली यावेळी आयोजित कार्यक्रमात जिल्हाधिकारी श्रीकांत बोलत होते. या कार्यक्रमास उपजिल्हा निवडणूक अधिकारी प्रताप काळे, तहसिलदार संजय वारकड, प्राचार्य बी. के. कुंभार, साक्षरता क्लबचे नोडल ऑफीसर प्रा. व्ही. डी. नितनवरे, प्रा. आर. बी. खरात अदिसह शासकीय तंत्रनिकेतनचे विद्यार्थी मोठया संख्येने उपस्थित होते.
निवडणूक साक्षरता क्लबच्या सदस्यांनी आपल्या महाविद्यालयातील १८ वर्षे पूर्ण करणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्यांचा फॉर्म भरून घ्यावा. त्याप्रमाणेच १८ वर्षाखालील विद्यार्थ्यांनाही निवडणूक साक्षर बनविण्यासाठी कार्य केले पाहीजे, असे जिल्हाधिकारी श्रीकांत यांनी सूचित केले. भारत निवडणूक आयोगाच्या सूचनेप्रमाणे नवीन व भविष्यातील मतदारांची निवडणूक साक्षरता वाढविण्यासाठी जिल्हयातील ९ वी ते १२ वी पर्यंत शाळा महाविद्यालयात निवडणूक साक्षरता क्लब स्थापन करण्यात येणार असून याअंतर्गत जिल्ह्यातील पहिला निवडणूक क्लब आज पुरणमल लाहोटी शासकीय तंत्रनिकेतन मध्ये स्थापन झालेला आहे, अशी माहिती उपजिल्हा निवडणूक अधिकारी प्रताप काळे यांनी दिली. प्रारंभी पुरणमल लाहोटी शासकीय तंत्रनिकेतन मध्ये स्थापन झालेल्या निवडणूक साक्षरता क्लब सदस्य व नोडल अधिकाऱ्यांचा सत्कार जिल्हाधिकारी श्रीकांत यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी प्राचार्य बी. के. कुभार यांनी तंत्रनिकेतनच्या कामकाजाची माहिती देऊन विविध शासकीय कार्यक्रमात पुर्णपणे सहभाग देण्याचे आश्वासन दिले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. बीएस पोतदार यांनी करून आभार मानले.
Comments