लातूर: देशाची एकता व अखंडता अबाधित ठेवून देशहित जोपासणे यासाठी भाजपा बांधील आहे. देशहिताला प्राधान्य देणे हीच भाजपाची परंपरा असून आता ती भाजपाची विचारधारा झालेली आहे. आगामी काळात जातीय दरी संपुष्टात आणण्यासाठी भाजपा कार्य करणार असून याकरिताच प्रजासत्ताकदिनी संपूर्ण देशात तिरंगा एकता रॅलीचे आयोजन करण्यात आले असून लातूरात भव्य रॅली काढावी असे आवाहन मुख्यमंत्र्यांचे स्वीय सहाय्यक अभिमन्यू पवार यांनी केले आहे. लातूरातील राजस्थान विद्यालयाच्या सभागृहात शहर जिल्हा भाजपा पदाधिकाऱ्यांसह विविध आघाड्यांचे व मोर्चाच्या पदाधिकाऱ्यांची व्यापक बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीच्या अध्यक्षस्थानी शहर जिल्हाध्यक्ष शैलेश लाहोटी यांची उपस्थिती होती. यावेळी व्यासपीठावर संघटन सरचिटणीस तथा नगरसेवक गुरुनाथ मगे, महापौर सुरेश पवार, उपमहापौर देविदास काळे, महिला शहर जिल्हाध्यक्षा सौ. ज्योती पांढरे, मनपा गटनेते अॅड. शैलेश गोजमगुंडे, शहरातील सहा मंडलाचे प्रभारी व अध्यक्ष यांच्यासह मोहन माने यांची उपस्थिती होती.
भीमा कोरेगाव सारख्या घटना केवळ राज्यातच नव्हे तर देशभरात पुन्हा घडू नये याकरीता भारतीय जनता पार्टीच्या वतीने काम करणे सुरु असून त्याचाच एक भाग म्हणून प्रजासत्ताकदिनी संपूर्ण देशभरात भाजपाच्या वतीने तिरंगा एकता रॅलीचे आयोजन करण्यात आले असल्याचे सांगून पवार यांनी ही रॅली मोठ्या प्रमाणात काढून लातूरातील जातीय एकता व अखंडता अबाधित ठेवण्यासाठी भाजपाच्या कार्यकर्त्यांनी या रॅलीत मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन अभिमन्यू पवार यांनी केले आहे. ज्या पक्षांकडून संविधानाचे उल्लंघन करुन राजकारण करण्यात आले, त्याच पक्षाकडून आता संविधान बचाव रॅली काढण्यात येत असल्याचे शहरजिल्हाध्यक्ष शैलेश लाहोटी यांनी स्पष्ट केले. या रॅलीच्या माध्यमातून विषारी राजकारण करण्याचे काम होत असून हे हाणून पाडण्यासाठी प्रजासत्ताक दिनी आयोजित करण्यात आलेली तिरंगा एकता रॅली मोठ्या प्रमाणात काढण्यात येईल अशी ग्वाही लाहोटी यांनी दिली. या रॅलीच्या पुर्वी शहरातील सहाही मंडलामध्ये तिरंगा फडकविण्यात येईल असे सांगून त्यानंतर प्रत्येक मंडलात तिरंगा एकता रॅली काढावी अशी सुचना मंडल प्रमुखांना केली. त्यानंतर या सहाही मंडलातून काढण्यात आलेल्या रॅली टाऊन हॉलवर एकत्रीत येतील असे सांगून त्या ठिकाणी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास अभिवादन करुन संविधानाचे पूजन करण्यात आल्यानंतर संपुर्ण शहरात तिरंगा एकता रॅली काढण्यात येणार आहे. त्यामुळे या रॅलीत शहरातील भाजपा पदाधिकारी, कार्यकर्ते यांच्यासह देशप्रेमी नागरिकांनी जास्तीत जास्त संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन केले.
Comments