लातूर: विधान परिषदेच्या लातूर, बीड, उस्मानाबाद स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघासाठी होणार्या निवडणुकीत भाजपाचे लातूर ग्रामीणचे नेते रमेश कराड यांच्या उमेदवारीसाठी मोर्चेबांधणी सुरू आहे. यासाठी रेणापूर तालुक्यातील एका शिष्टमंडळाने मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांसह इतर मंत्र्यांना भेटून साकडे घातले आहे. दरम्यान पक्षश्रेष्ठींकडे कराड यांच्या उमेदवारीबाबत विचार करण्याचे आश्वासन शिष्टमंडळाला दिल्याचा दावा पंचायत समितीचे सभापती अनिल भिसेंनी केला आहे. सध्या माजी मंत्री दिलीपराव देशमुख हे सदस्य असलेल्या स्थानिक स्वराज्य संस्था मतदार संघाची निवडणुक काही महिन्यांवर येऊन ठेपली आहे. तिनही जिल्ह्यांचे स्थानिक स्वराज्य संस्थेतील पक्षीय बलाबल पाहता भाजपाची मते सर्वाधिक आहेत. या निवडणुकीत शिवसेना आणि काही अपक्ष मतदारांनी सहकार्य केले तर भाजपाच्या उमेदवाराला या निवडणुकीत सहज विजय मिळू शकतो. दुसरीकडे कराड यांचे राजकीय कार्यक्षेत्र रेणापूर आणि लातूर ग्रामीण भागात आहे. त्यांनी २००९ आणि २०१४ मध्ये भाजपाकडून लातूर ग्रामीण मतदारसंघातून निवडणूक लढविली आहे.
Comments