लातूर: बहुआयामी व्यक्तिमत्वाचे धनी कृषिरत्न कर्मयोगी रामकिशन भंडारी यांच्या अर्धाकृती पुतळ्याचे अनावरण रविवारी २८ जानेवारी रोजी सकाळी १० वाजता माजी केंद्रीय गृहमंत्री शिवराज पाटील चाकूरकर यांच्या हस्ते होणार आहे. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी मंत्री आ. दिलीपराव देशमुख हणार आहेत. स्व. भंडारी यांच्या प्रथम स्मृतीदिनाचे औचित्य साधून शेतकरी मेळावाही आयोजित करण्यात आला आहे.
या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून खा. डॉ. सुनील गायकवाड यांची उपस्थिती राहणार आहे. आष्टा येथील आर.पी. भंडारी फार्म हाऊस याठिकाणी संपन्न होणाऱ्या या कार्यक्रमास राज्य कृषी मूल्य आयोगाचे अध्यक्ष पाशा पटेल,आ. विनायकराव पाटील, आ. बसवराज पाटील मुरूमकर, आ. जयप्रकाश मुंदडा, माजी राज्यमंत्री बाळासाहेब जाधव, शिवाजीराव पाटील कव्हेकर, साक्षरता परिषदेचे माजी अध्यक्ष त्र्यंबकदास झंवर, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस बसवराज पाटील नागराळकर, लातूर अर्बन बँकेचे अध्यक्ष प्रदीप राठी, उस्मानाबाद जनता बँकेचे अध्यक्ष ब्रिजलाल मोदाणी, जिल्हाधिकारी जी. श्रीकांत, गुजरातच्या जामनगरचे पोलीस अधीक्षक प्रदीप शेजूळ, पोरबंदरच्या पोलीस अधीक्षक शोभा भुतडा यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे. या कार्यक्रमात कृषिकन्या प्रेमलता अशोक बद्दे यांचा मान्यवरांच्या हस्ते सन्मान करण्यात येणार आहे.
स्व. रामकिशन भंडारी शिक्षण, समाजकारण, राजकारण अशा विविध क्षेत्रांबरोबरच कृषी क्षेत्रांतही कार्यरत होते. त्यांना कृषीरत्न पुरस्कारानेही सन्मानित करण्यात आले होते. शेतीत नेहमी नवनवे प्रयोग करण्यात ते अग्रेसर असत. त्यामुळे त्यांच्या प्रथम स्मृतिदिनाचे औचित्य साधून जिल्हास्तरीय शेतकरी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. या मेळाव्याचे अध्यक्षस्थान त्र्यंबकदास झंवर हे भूषविणार आहेत. मेळाव्याचे उद्घाटन अधीक्षक कृषी अधिकारी राजकुमार मोरे यांच्या हस्ते करण्यात येणार आहे. यावेळी प्रमुख मार्गदर्शक म्हणून टाटा कँसर हॉस्पिटल मुंबईचे डॉ. नवनाथ धुमाळ, वन औषधी व नैसर्गिक शेती तज्ज्ञ हभप विष्णू महाराज भोसले, भागवताचार्य हभप शाळू महाराज, सेंद्रिय शेती, आर्ट ऑफ लिव्हिंगचे समन्वयक महादेव गोमारे, नैसर्गिक उपचार तज्ज्ञ किरण पाटील, तालुका कृषी अधिकारी बी.टी. पाटील हे उपस्थित राहणार आहेत.
Comments