लातूर: खरीप २०१६ च्या पीक विम्यात २०.६६ कोटी रुपयांची वाढ होऊन ३८५ कोटी रुपये लातूर जिल्ह्यासाठी मंजूर झाले असल्याबाबत मुख्य सांख्यिकी कृषी आयुक्त पुणे यांचे पत्र सामाजिक कार्यकर्ते सुनील मदाडे यांना प्राप्त झाले आहे. पंतप्रधान पीक विमा योजना खरीप २०१६ अंतर्गत पीक विमा वाटपाच्या वेळेस शासनाने काही पिके अंडर प्रोसेसच्या नावाखाली राखीव ठेवली होते. त्या पीक विम्याची रक्कम शेतकर्यांना प्राप्त झाली नव्हती. याबाबत लातूर जिल्ह्यातील काही राजकीय पक्ष व शेतकरीसंघटनानी शासनाकडे वारंवार तक्रार अर्ज केले होते. याची शासनाने दखल घेवून कांही अंशी रक्कम मंजूर केली.
पंतप्रधान पीक विमा योजना खरीप २०१६ मध्ये शेतकर्यांनी ३४.१० लाख रूपये विमा हप्ता शासनाकडे जमा केला होता. दुष्काळी परिस्थितीमुळे शासनाने ३६४ कोटी ३७ लाख रूपये लातूर जिल्ह्यासाठी मंजूर केले होते. लातूर जिल्ह्यातील सर्व मंडळ निहाय काही पिकांचा अपवाद वगळता सोयाबीन या पिकासाठी विमा प्राप्त झाला होता. इतर पिके ज्वारी, बाजरी, भात साळ, सुर्यफूल, भुईमूग, कारळ, तीळ व इतर थोड्याफार प्रमाणात सर्वच पिके अंडर प्रोसेसच्या नावाखाली ठेवली होती. त्या पिकांसाठी पीक विमा मंजूर केला नव्हता. याची काही अंशी दखल शासनाने घेतली आहे.
पंतप्रधान पीक विमा योजना खरीप २०१६ मध्ये लातूर जिल्ह्यातील ११६०८४२ शेतकर्यांनी सहभाग घेतला होता. त्यापैकी ५००७०४ शेतकर्यांना रक्कम रूपये ३८५.०३ कोटी रूपये नुकसान भरपाई निश्चित करण्यात आली असून संबंधित बॅकांमार्फत पात्र लाभ धारकांच्या बॉक खात्यावर जमा करण्यात आली असल्याबाबतचे पत्र मुख्य खांख्यिकी, कृषी आयुक्तालय, महाराष्ट्र राज्य, पुणे, विभागीय कृषी सहसंचालक, लातूर जिल्हा कृषी अधिक्षक, लातूर यांना पत्र प्राप्त झाले आहे.
Comments