लातूर: मुख्यमंत्री जास्त काळ कुठे बाहेर जाणार असतील तर वरिष्ठ मंत्र्याकडे आपले अधिकार देऊन जातात. अडचणीच्या वेळी राज्याची अडचण होऊ नये म्हणून ही तजवीज केली जाते. तद्वतच महापौरांचंही आहे. महापौरांनी अशा मोठ्या दौर्यावर जाताना आपले अधिकार उप महापौरांकडे द्यायला हवेत. पण असे होऊ नये अशी त्यांची इच्छा असावी म्हणून त्यांनी आपण मुंबईला चाललो आहोत एवढेच सांगितले आणि सिंगापुरला रवाना झाले. महापौरपदाचे अधिकार काही काळापुरते का होईना उप महापौरांकडे गेले आणि आपल्याला पसंत नसणारे निर्णय त्यांनी घेतले तर करायचं काय असा प्रश्न त्यांना पडला असावा म्हणून त्यांनी ही खेळी केली असे लातूर महापालिकेच्या पदाधिकार्यात बोलले जात आहे.
काल अनेकांना महापौरांना भेटायचं होतं, बोलायचं होतं पण ते सापडत नव्हते. अनेकांनी अनेकांकाकडे चौकशी केली तेव्हा ते मुंबईला गेल्याचे कळाले. काही सुत्रांनी मात्र सिंगापुरला जाण्यासाठी ते मुंबईला गेले असे सांगितले. त्यांना अनेकांनी फोन केला पण ते फोनही घेत नव्हते. याची बातमी जेव्हा आजलातूरने प्रकाशित केली तेव्हा त्यांच्या खास व्यक्तीकडून त्यांना निरोप गेला असावा. मग नाईलाजाने त्यांनी एका स्थानिक वर्तमानपत्राला नेमके कुठे जात आहोत, का जात आहोत हे सांगितले. यामुळे उप महापौर नक्कीच दुखावले असणार. कारण ते सतत सावलीसारखे महापौरांसोबत असायचे पण महापौरांनी त्यांनाही नीट माहिती दिली नव्हती! मग बाकिच्यांचं काय?
Comments