लातूर: देशातील ज्ञानाची खाण लातूर जिल्ह्यात असून ही खाण निर्माण करण्यात शिक्षण संस्थांचा मोठा वाटा आहे. साहाजिकच या वाट्यामध्ये टंकलेखन व लघुलेखन संस्थांचा वाटा आहे. अडचणीवर मात करीत बदलत्या काळानुरूप आपल्या संस्थांमध्ये बदल करणारे संस्थाचालक डिजिटल इंडियामध्ये मोठे योगदान देत आहेत. त्यांच्या या योगदानामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे डिजिटल इंडियाचे स्वप्न साकार होण्यास निश्चितच मदत होणार असल्याने या संस्थाचालकांचे प्रश्न सोडविण्यासाठी शासनदरबारी पाठपुरावा करू अशी ग्वाही पालकमंत्री संभाजीराव पाटील निलंगेकर यांनी दिली.
राज्यातील टंकलेखन, लघुलेखन शासनमान्य संस्थांचे राज्यस्तरीय अधिवेशन येथील दिवाणजी मंगल कार्यालयात पार पडले. या अधिवेशन उद्घाटनप्रसंगी पालकमंत्री निलंगेकर बोलत होते. यावेळी व्यासपीठावर संघटनेचे प्रदेशाध्यक्ष प्रकाश कराळे, अधिवेशनाचे स्वागताध्यक्ष प्रा. नंदकुमार देशमुख, राज्य परिक्षा परिषदेचे अध्यक्ष दत्तात्रय जगताप, दादासाहेब गायकवाड, निलंग्याचे नगराध्यक्ष बाळासाहेब शिंगाडे, लातूर मनपाचे नगरसेवक अॅड. दिपक मठपती आदींची व्यासपीठावर प्रमुख उपस्थिती होती.
टंकलेखन शिकविण्यासाठी राज्यभरात मोठ्या संस्था असून आता टंकलेखन कालबाह्य झालेले असल्याने या संस्था अडचणीत आल्या होत्या, असे सांगून पालकमंत्री निलंगेकर म्हणाले की, काळानुरूप होणारे बदल स्वीकारून आलेल्या अडचणीवर मात करणार्या टंकलेखन व लघुलेखन संस्थांचे प्रश्न तितकेच महत्वाचे आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी डिजिटल इंडिया हा उपक्रम सुरू केलेला आहे. त्यामुळेच आता टंकलेखनाऐवजी संगणक लेखन काळाची गरज बनलेली आहे. ही गरज ओळखूनच टंकलेखन संस्थाचालकांनी आपल्या संस्थांमधून संगणक टंकलेखन व लघुलेखन याचे शिक्षण देण्यास सुरुवात केली आहे. साहाजिकच याचा फायदा शासन व प्रशासनाला होणार असल्याचे सांगून पालकमंत्री निलंगेकरांनी या संस्थाचालकांचे प्रश्न सोडविणे शासनाची जबाबदारी असल्याचे सांगितले.
या उद्घाटन कार्यक्रमाचे प्रास्ताविक स्वागताध्यक्ष नंदकुमार देशमुख यांनी केले. यावेळी संघटनेच्या वतीने पालकमंत्री निलंगेकर यांचा यथोचित सत्कार करण्यात आला. या अधिवेशनात राज्यातील विविध कानाकोपर्यात असलेले टंकलेखन व संगणक लेखन संस्थाचालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Comments