लातूर: लातूर महानगरपालिकेतील तिजोरी चोरीला गेल्यानं अब्रुची लक्तरं वेशीवर टांगली गेली आहेत. महानगरपालिकेतील सर्वसाधारण सभा, स्थायीच्या बैठका सातत्याने गाजत असतात. काही सभा तर दोन दोन दिवस चालायच्या. पण तिजोरी प्रकरणी सगळे शांत कसे? असा प्रश्न सामान्य जनता विचारत आहे. एरवी राईचा पर्वत करुन भांडणारे विरोधी कॉंग्रेसचे नगरसेवक, महापौरांच्या टेबलावर चढून माईक फेकून देणारे नगरसेवक तिजोरी प्रकरणी शांत का आहेत? तिजोरी कुणी नेली हे दोघांना माहित असावे म्हणून ही शांती नांदत असल्याचे काहीजण बोलतात. अलीकडे विरोधक शांत शांत असल्याने लोक रोज वेगवेगळ्या दैनिकांची लातुरची पाने चार चारदा चाळत आहेत. अलीकडेच झालेल्या एका सभेपूर्वी अनेक कोटींची कामे नगरसेवकांना वाटण्यात आली. यात दोन्ही बाजुच्या सदस्यांना प्रभागातील कामासाठी न्याय्य वाटा मिळाला. त्यामुळेच सगळे शांत आहेत असे एका नगरसेवकाने सांगितले. आर्थिक विषय असेल तरच मनपात आंदोलने, भांडाभांडी होते. बाकी इतर काळात सगळ्यांचेच गळ्यात गळे असतात. यातली नाराज मंडळी मात्र कशाला यायचं मनपात? काय आहे इथं? निवडणुकीत गेलेले पन्नास लाख कसे निघतील हा सर्वात मोठा प्रश्न आहे असे तळतळून सांगतात!
Comments