HOME   लातूर न्यूज

व्यापारी संकुल धोरणात व्यापार्‍यांवर अन्याय होणार नाही

प्रभारी महापौर देविदास काळे यांची ग्वाही, प्रभारी म्हणून पहिलीच बैठक


व्यापारी संकुल धोरणात व्यापार्‍यांवर अन्याय होणार नाही

लातूर: शहरातील गोलाई, गांधी मार्केट व मिनी मार्केट या परिसरात महानगरपालिका मालकीची व्यापारी संकुले आहेत. या संकुलामध्ये असलेल्या भाडेकरुंचे करारनामे संपले असून त्यांना नोटीस दिल्या असल्या तरी या गाळयांचे धोरण ठरवत असताना व्यापार्‍यांवर अन्याय होणार नाही अशी ग्वाही प्रभारी महापौर देविदास काळे यांनी दिली आहे. शहरातील गोलाई, मिनी मार्केट व गांधी मार्केट या परिसरात मनपाच्या मालकीची व्यापारी संकुले असून या संकुलामध्ये ३३० गाळे आहेत. या गाळयांची कराराची मुदत संपल्याने तेथील व्यापार्‍यांना नोटीसा देण्यात आलेल्या आहेत. या गाळयांचे नविन धोरण ठरविण्यात येत असून याबाबत प्रभारी महापौर देविदास काळे, स्थायी समिती सभापती अशोक गोविंदपूरकर,आयुक्त अच्युत हंगे, सभागृह नेते अ‍ॅड. शैलेश गोजमगुंडे व विरोधी पक्ष नेते अ‍ॅड. दिपक सूळ यांच्या उपस्थितीत व्यापार्‍यांची बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीला तिन्ही व्यापारी संकुलामधील व्यापार्‍यांचे शिष्टमंडळ उपस्थित होते.
लातूर शहराच्या विकासात व्यापार्‍याचे मोठे योगदान असून त्याचे हे योगदान निश्‍चितीच प्रशंसनीय असल्याचे सांगून प्रभारी महापौर देविदास काळे यांनी सध्या मनपाची आर्थिक परिस्थिती हलाखीची आहे. त्यामुळे शहराला नागरी सुविधा पुरविण्यात अडचण येत असून नविन विकास योजना राबविणे अवघड होऊ लागलेले आहे. त्यामुळेच मनपाचे आर्थिक उत्पन्न वाढावे या उद्देशाने या व्यापारी संकुलात असलेल्या गाळयांच्या करारनाम्याची मुदत संपली असल्याने तेथील व्यापार्‍यांना नोटीस देण्यात आली असल्याचे प्रभारी महापौर काळे यांनी सांगितले. या गाळयांचे नवीन धोरण ठरविण्यात येत असून सदर धोरण ठरवित असताना व्यापार्‍यांवर कोणताही अन्याय होणार नाही अशी ग्वाही देऊन व्यापार्‍यांनी मनपाला सहकार्य करावे असे आवाहन केले.
आगामी काळात सदर धोरण ठरवित असताना व्यापार्‍यांचे म्हणणे ऐकून प्रशासन भूमिका ठरविणार असून व्यापार्‍यांचे म्हणणे ऐकून घेण्यासाठी प्रशासनाला सोबत घेऊन बैठक आयोजित करण्यात आली असल्याची माहिती प्रभारी महापौर काळे यांनी दिली. नविन धोरण ठरवत असताना प्रथम जुन्या व्यापार्‍यांना प्राधान्य देण्यात येईल असे सांगून व्यापार्‍यांनी जास्तीत जास्त सहकार्य करुन मनपाचे आर्थिक उत्पन्न वाढविण्यासाठी सांमजस्यांची भूमिका घ्यावी असे व्यापार्‍यांना सांगितले. प्रशासनाकडे व्यापार्‍यांची भूमिका मांडण्याचे काम आमचे असून ही भूमिका मांडत असताना व्यापार्‍यांवर अन्याय होऊ देणार नाही. मात्र व्यापार्‍यांनी सुध्दा मनपाच्या आर्थिक परिस्थितीचा विचार करावा जेणेकरुन मनपाची आर्थिक परिस्थिती सुधारुन नागरिकांसह व्यापार्‍यांनाही सोयी सुविधा उपलब्ध करुन देणे सहज शक्य होणार आहे. त्यामुळे व्यापार्‍यांनी आम्हाला सहकार्य करावे असे आवाहन प्रभारी महापौर देविदास काळे यांनी केले आहे.
यावेळी तिन्ही व्यापारी संकुलातील व्यापार्‍यांसह स्थायी समिती सदस्य शैलेश स्वामी, उपायुक्त कांबळे, मालमत्ता व बांधकाम विभागाचे अधिकारी उपस्थित होते.


Comments

Top