HOME   लातूर न्यूज

प्रशासनात एक माणूसही चांगला बदल करू शकतो- जिल्हाधिकारी


प्रशासनात एक माणूसही चांगला बदल करू शकतो- जिल्हाधिकारी

लातूर: जिल्हा प्रशासनात जिल्हाधिकाऱ्यांच्या भूमिका बदलत आहेत. सर्वसामान्य नागरिकांना विविध शासकीय योजनांचा लाभ वेळेत मिळवून देण्यासाठी प्रशासन प्रयत्नशील असते. प्रशासनातील एक माणूसही सकारत्मक दृष्टीने काम करून चांगला बदल घडवू शकतो, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी जी. श्रीकांत यांनी केले. येथील दयानंद सभागृहात जेष्ठ नागरिक संघ लातूर मार्फत निवृत्त सनदी अधिकारी श्याम देशपांडे लिखीत ‘सदसद विवेक ग्रंथ परिसंवाद’ व त्यांच्या प्रशासकीय, सामाजिक योगदानाबदल सत्कार कार्यक्रम प्रसंगी जिल्हाधिकारी जी. श्रीकांत बोलत होते. यावेळी सत्कारमुर्ती श्याम देशपांडे, माजी खासदार डॉ. गोपाळराव पाटील, प्राचार्य नागोराव कुंभार, उपसंचालक (माहिती) यशवंत भंडारे, जेष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष बीआर पाटील व महाविद्यालयीन विद्यार्थी, नागरिक उपस्थित होते.
सातारा येथे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून काम करताना श्याम देशपांडे यांनी सुरू केलेली अनेक कामे आपण मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून रूजू झाल्यानंतर पुढे सुरू ठेवली होती. त्यांच्या अनुभवाचा आपल्याला नेहमीच फायदा होत गेला असे जिल्हाधिकारी जी. श्रीकांत यांनी सांगून त्यांच्या ‘सदसदविवेक’ ह्या पुस्तकातील प्रशासनातील कामांचे अनुभव इतर अधिकारी व स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यासाठी मोलाचे आहेत, असे मत त्यांनी व्यक्त केले.
समाजात चांगले व भ्रष्टाचार न करणाऱ्या लोकांची संख्या खूप मोठी आहे. परंतू भ्रष्टाचार करणारे काही वाईट लोक त्या चांगल्या लोकांना सुधारणा करण्यास वाव देत नाहीत, असे मत माजी खासदार गोपाळराव पाटील यांनी मांडले तसेच भ्रष्टाचार व जातीवाद समाजातून हद्यपार होण्यासाठी तंत्रज्ञानाची मदत होईल. त्याप्रमाणेच सध्या भारतातील मध्यमवर्गाच्या नैतिकतेत चांगला बदल होत असल्याचे ही त्यांनी सांगितले व श्याम देशपांडे यांनी प्रशासन भ्रष्टाचार मुक्त करण्यासाठी कृतीशील प्रयत्न केल्याचे त्यांनी सांगितले.
प्रशासनात संवेदनशीलता व विनयशीलता कमी होत आहे, परंतू श्याम देशपांडे यांनी संवेदनशील व विनयशील राहुन काम केल्याचे गौरवोद्गार श्री. कुंभार यांनी काढले. तर विभागीय माहिती कार्यालयाचे उपसंचालक भंडारे यांनी श्याम देशपांडे यांच्या ‘सदसदविवेक’ पुस्तकातील माहिती सांगून जालना येथे श्री. देशपांडे यांनी टंचाई असलेला जालना जिल्हा ‘पाणीदार’ करण्यासाठी केलेल्या कार्याची माहिती दिली.


Comments

Top