लातूर: येथील उच्चतम कृषी उत्पन्न बाजार समितीच्या कार्यक्षेत्रातील सर्व कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये उडीद, तुर, मुग, सोयाबीन इत्यादी शेतीमालाची शासन हमीभावापेक्षा कमी दराने खरेदी चालू आहे. ती तात्काळ बंद करुन लूट करणार्या संबंधित आडत, व्यापारी व संबंधित अधिकारी यांच्यावर फौजदारी गुन्हे दाखल करावेत. या मागणीसाठी २६ जानेवारी २०१८ पासून बळीराजा मराठवाडा शेतकरी समितीच्यावतीने धरणे आंदोलन केले जात आहे. संबंधित अधिकारी या आंदोलनाकडे दुर्लक्ष करीत आहेत असा आरोप समितीचे सचिव उमाकांत मंगरुळे यांनी केला आहे. आर्थिक संकटात सापडलेल्या शेतकर्यांचा नाजूक परिस्थितीचा गैरफायदा घेत दिवसाढवळ्या उडपणे लूट करीत असल्याने गरीब शेतकरी मोठ्या प्रमाणात बळी पडत आहे. गतवर्षी या संघटनेच्या वतीने विविध मागण्यांकरिता या कार्यालयासमोर तब्बल ३५ दिवस आंदोलन छेडले होते. इतका प्रदिर्घ वेळ देऊनसुद्धा एकाही मागणीची पुर्तता झाली नाही ही अत्यंत दुदैंवी बाब आहे. यावरुन शेतकर्यांना न्याय देण्याची विभागीय सहनिबंधक कार्यालयाकडून कसल्याही प्रकारची दखल घेतल्याची मानसिकता दिसून येत नाही. त्यामुळे पुनश्च आपल्या कार्यालयासमोर सुट्टीचे दिवस वगळुन विविध प्रकारच्या मागणीसाठी तीव्र आंदोलनास सुरुवात केली आहे. आमच्या मागण्यावर संघटना ठाम असून, जोपर्यंत संबंधितांवर फौजदारी गुन्हे दाखल होणार नाहीत, तोपर्यंत आंदोलनाचे स्वरुप असेच तीव्र करण्यात येईल आणि पुर्वसुचनेशिवाय आंदोलनाची दिशा ठरविण्यात येईल तसेच आंदोलनाच्या माध्यमातुन होणार्या परिणामास आपण स्वतःवर संबंधित अधिकारी जबाबदार राहतील याची नोंद घ्यावी असा इशारा बळीराजा मराठवाडा शेतकरी समितीचे अध्यक्ष आत्माराम लिंबाजी वाघ, सचिव उमाकांत मंगरुळे, विशाल सुर्यवंशी यांनी दिला आहे.
Comments