लातूर: आम आदमी पार्टीचे कार्यकर्ते अमित पांडे यांना ३० जानेवारीला बेदम, अमानुष मारहाण करणार्या फरमान सालेमियॉं बारब्बा या पोलीस शिपायास निलंबीत करण्यात आले असल्याचे जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. शिवाजी राठोड यांनी आपच्या शिष्टमंडळाला सांगितले. त्यामुळे पत्रकार परिषदेत जाहीर नियोजित धरणे आंदेालन मागे घेण्यात येत असल्याचे अजिंक्य शिंदे यांनी कळविले आहे. याबाबत अधिक माहिती अशी की दिल्लीत व्यापार्यांच्या मुळावर उठलेल्या सिलींग विरोधात आंदेालन करणार्या आप कार्यकर्त्यांवर लाठीमार केल्याच्या निषेधार्थ लातूर येथे रितसर परवानगी घेवून ३० जानेवारी रोजी सायंकाळी गांधी चौकात आम आदमी पार्टीच्या कार्यकर्त्यांनी शांततेत निदर्शने केली. पण त्यानंतर पोलीस शिपाई फरमान बारब्बा यांनी आप कार्यकर्ते अमित पांडे यांना नाव विचारले म्हणून फरफटत नेवून गांधी चौक पोलीस ठाण्यात बेल्टने अमानुष मारहाण केली. त्यावर अमित पांडे यांच्या तक्रारीवरुन बारब्बा यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला पण त्यांना अटक व निलंबन होत नव्हते. त्यामुळे आपने गुरुवारी दुपारी पत्रकार परिषद घेवून बारब्बा यांना बडतर्फ करुन दोन दिवसात कठोर कारवाई न केल्यास गांधी चौकात आपतर्फे धरणे आंदोलन करण्यात येईल असा इशारा दिला. पत्रपरिषदेनंतर आपचे लातूर शहर निरीक्षक अजिंक्य शिंदे, कार्यकर्ते आनंदा कामगुंडा, सुमित दीक्षित, हरी गोटेकर, नितीन चालक, अमित पांडे, शाम माने आदिंनी पेालीस अधीक्षक डॉ. शिवाजी राठोड यांची भेट घेवून निवेदन सादर केले. त्या कर्मचार्यास बडतर्फ व अटक करुन कठोर कारवाई करण्याची मागणी केली, त्यावेळी एसपी राठोड यांनी बारब्बा यांच्यावर काल बुधवारीच निलंबनाची कारवाई करण्यात आल्याचे सांगून नियोजित धरणे आंदोलन मागे घेण्याची विनंती केली, त्यामुळे पत्रपरिषदेत जाहीर केलेले नियोजित आंदोलन तूर्त मागे घेण्यात येत असल्याचे आपतर्फे कळविण्यात आले आहे.
Comments