लातूर: नगरसेवक विक्रांत गोजमगुंडे यांनी गेल्या कांही वर्षापासून केलेल्या सातत्यपुर्ण परिश्रमाचे चीज झाले असून त्यांच्या प्रभागातील मनपाच्या शाळा क्र. ९ ला आयएसओ मानांकन प्राप्त झाले आहे. विशेष म्हणजे असे मानांकन मिळवणारी ही मराठवाडयातील मनपाची पहिलीच माध्यमिक शाळा ठरली आहे. अशी शाळा मतदार संघात आहे हे आपले भाग्यच असल्याचे सांगत आ. अमित देशमुख यांनी विक्रांत गोजमगुंडे व मुख्याध्यापक शिंदे यांचे तोंडभरुन कौतुक केले. विशेष म्हणजे या शाळेच्या अभ्यासिकेसाठी १० लाख रुपयांचा आमदार निधी देण्याची घोषणा करतानाच क्रिडा साहित्य व मैदानावरील इतर खेळणी स्वःखर्चातून देऊन गरीब विद्यार्थ्यांना स्वतःकडून शिष्यवृत्ती देण्याची घोषणाही त्यांनी केली.
नगरसेवक तथा स्थायी समितीचे माजी सभापती विक्रांत गोजमगुडे यांच्या प्रभागात मनपाची शाळा क्र. ९ ही चालते. मागच्या वेळी स्थायी समिति सभापती असताना गोजमगुंडे यांनी या शाळेचे पालकत्व स्विकारले होते. शाळेचा चेहरा-मोहरा बदलण्यासाठी वैयक्तिक लक्ष देऊन ते प्रयत्नात होते. यामुळेच स्थायी समितीचे सभापती असताना मनपाकडून त्यांनी शाळेसाठी भरघोस निधी उपलब्ध करुन दिला होता. शिवाय शाळेला आयएसओ दर्जा मिळावा यासाठी लागणारा खर्च त्यांनी खिशातून केला होता. यामुळेच मनपाची ही शाळा आज सर्वार्थाने ज्ञानमंदिर बनली आहे. या शाळेत ई-लर्निंग उपलब्ध आहे. सुसज्ज असा संगणक कक्ष, विद्यार्थ्यांसाठी आवश्यक शैक्षणिक सॉफ्टवेअर तेथे असून क्रिडांगणही विकसीत करण्यात आले आहे. या शाळेत वर्षभरात विविध प्रकारचे ५२ उपक्रम राबविले जातात. दरररोज एका विद्यार्थ्याला भाषणाची संधी उपलब्ध करुन दिली जाते. विद्यार्थी व विद्यार्थीनीसाठी स्वतंत्र शौचालय येथे असून विज्ञान व कला महोत्सव दरवर्षी घेतला जातो. या शाळेला नुकतेच आयएसओ मानांकन प्राप्त झाले असून आज रोजी पार पडलेल्या वार्षिक स्नेह सम्मेलनात माजी राज्यमंत्री आ. अमित देशमुख यांच्या हस्ते मनपा आयुक्त अच्युत हंगे व शाळेचे मुख्याध्यापक शिवदास शिंदे यांना आयएसओ प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले. यावेळी नगरसेवक कार्यक्रमाचे स्वागताध्यक्ष विक्रांत गोजमगुंडे, बाजार समितिचे सभापती ललितभाई शहा, नगरसेवक राजा मणियार, कैलाश कांबळे, आसिफ़ बागवान,पूजा पंचाक्षरी, गौरव काथवटे, डॉ फरजाना बागवान, यांची उपस्थिती होती. नगरसेवक राजा मणियार यांनी शाळेची प्रगती पाहता निधीची आवश्यकता भासली तर स्वतःच्या प्रभागासाठी आलेला निधी शाळेसाठी वळविण्याचे आश्वासन दिले.
Comments