HOME   लातूर न्यूज

जिल्हाधिकार्‍यांनी घेतला सिध्देश्‍वर यात्रेच्या पूर्व तयारीचा आढावा

यात्रेदरम्यान भार नियमन होणार नाही याची काळजी घ्यावी!


जिल्हाधिकार्‍यांनी घेतला सिध्देश्‍वर यात्रेच्या पूर्व तयारीचा आढावा

लातूर: महाशिवरात्री निमित्त आयोजित केला जाणारा सिध्देश्‍वर यात्रा महोत्सव अवघ्या कांही दिवसावर येऊन ठेपला असून शनिवारी जिल्हाधिकारी जी.श्रीकांत यांनी यात्रे संदर्भात सर्व विभाग प्रमुखांची बैठक घेऊन पूर्व तयारीचा आढावा घेतला. सर्व विभागांना आवश्यक त्या सूचना करतानाच यावर्षीचा यात्रा महोत्सव भव्य दिव्य करण्याचा मानस व्यक्त केला. या बैठकीस महावितरण, महानगरपालिका, आरोग्य, कृषी, पोलिस व जिल्हा परिषदेच्या विविध विभागांचे प्रमुख उपस्थित होते. बैठकीत बोलतांना जिल्हाधिकारी जी.श्रीकांत यांनी यात्रा महोत्सव सुरळीतपणे पार पाडण्यासाठी सर्व विभागांनी समन्वय राखून काम करण्याचे आवाहन केले. हा महोत्सव अधिक चांगला व्हावा यासाठी यात्रा सुरु होण्यापूर्वी सर्वांनीच यात्रा स्थळाला भेट देण्याची त्यांनी सूचना केली. १० फेब्रुवारी आपण स्वतः भेट देणार असून सर्व विभाग प्रमुखांनी उपस्थित रहावे असे निर्देश त्यांनी दिले. यावर्षी यात्रा रात्री ११ वाजेपर्यंत सुरु ठेवण्याचे निर्देश जिल्हाधिकार्‍यांनी पोलिस विभागाला दिले. यात्रा ११ वाजेपर्यंत सुरु राहणार असली तरी ध्वनीक्षेपक मात्र निर्धारित वेळेतच बंद होतील. यात्रेदरम्यान स्वच्छतेचे विविध उपक्रम प्रभावीपणे राबवून यात्रा परिसर स्वच्छ ठेवावा अश्या सूचनाही त्यांनी केल्या.
यात्रेत कसलाही व्यत्यय येऊ नये यासाठी महावितरणने दक्षता बाळगावी. विद्युत व्यवस्था चोख असावी तसेच भार नियमन होणार नाही याची काळजी घ्यावी अश्या सूचना त्यांनी महावितरणला केल्या. यात्रेदरम्यान भाविकांना आरोग्याच्या समस्या उद्भवू नयेत यासाठी आरोग्य विभागाने प्रथमोपचार्‍याच्या सुविधा सज्ज ठेवाव्यात. संपूर्ण यात्रा परिसरात सीसीटीव्ही लावून परिसर निगराणी खाली ठेवावा असे आवाहनही जिल्हाधिकारी जी. श्रीकांत यांनी केले. या बैठकीस मुख्य कार्यकारी अधिकारी विपीन ईटनकर, अप्पर पोलिस अधीक्षक काकासाहेब डोळे, उपजिल्हाधिकारी अनंत गव्हाणे यांच्यासह सर्व विभाग प्रमुख देवस्थानचे अध्यक्ष विक्रम गोजमगुंडे, संयोजक बाबासाहेब कोरे, अशोक भोसले, ज्ञानोबा कलमे, सहसंयोजक विक्रांत गोजमगुंडे, व्यंकटेश हालींगे, ओमप्रकाश गोपे, महादेव खंडागळे, विष्णु साबदे, धर्मादाय कार्यालयाचे निरीक्षक सरवदे यांच्यासह देवस्थानचे विश्‍वस्त व पदाधिकारी उपस्थित होते.


Comments

Top