कालचा दिवस लातूरच्या भाजपानं गाजवला. यशवंतपूर रेल्वेचं स्वागत आपापलंच करुन घेतलं. दुसर्या पक्षाचा कुणीही नव्हता. किमान रेल्वे संघर्ष समितीला, प्रवासी संघटनेला तरी बोलवायला हवं होतं. नागरिकांना आवाहन करायला हवं होतं. या गाडीतून जाणारे, स्टेशनवर काम करणारे, भाजपाचे कार्यकर्ते, दोन चार नगरसेवक, भरपूर नेते आणि पदाधिकारी एवढाच मेळा स्टेशनवर दिसला. कायम विरोधात असल्यानं भाजपावाल्यांना लातुरचा कानकोपरा, चौक, गल्ल्या आणि बोळं चांगली पाठ झाली आहेत. जेवढ्या मोक्याच्या जागा होत्या तेवढ्या ठिकाणी बोगीचा कारखाना आणल्याबद्दल अभिनंदन करणारे होर्डींग्ज लटकले होते. खासदारांच्या समर्थकांनी लावलेल्या फलकांवर पालकमंत्र्यांचा फोटो नव्हता. अन पालकमंत्र्यांनी लावलेल्या फलकावर खासदारांचा फोटो नव्हता. विद्यार्थी आघाडीने मात्र कर्तव्य बजावलं. त्यांच्या फलकावर दोघांचेही फोटो होते. पण फलकावर यशवंतपूर गाडीचा उल्लेखही नव्हता. कालचा मुख्य कार्यक्रम यशवंतपूर गाडी सुरु होण्याचा होता. पण एकाही फलकावर त्यासाठी जागा नव्हती. उलट यशवंतपूर गाडीच्या इंजिनावर ‘भारतीय जनता पार्टी’ असा फलक दिमाखात झळकत होता. यावर मात्र पालकमंत्र्यांचा मोठा, खासदार आणि आमदार भालेरावांचा केविलवाण्या आकारातील फोटो नीट पाहिल्यावर दिसत होता.
Comments