लातूर: लातूर जिल्ह्यात रेल्वे बोगी कारखाना उभारण्यास मंजूरी मिळाली असून या करिता पालकमंत्री निलंगेकर व अभिमन्यू पवार यांच्यासह खा. डॉ. सुनिल गायकवाड यांनी पाठपुरावा केल्याबद्दल शहर जिल्हा भाजपाच्या वतीने त्यांचा भव्य सत्कार करून कृतज्ञता व्यक्त करण्यात आली. याप्रसंगी व्यासपीठावर शहर जिल्हाध्यक्ष शैलेश लाहोटी, संघटन सरचिटणीस गुरुनाथ मगे, महापौर सुरेश पवार, उपमहापौर देविदास काळे, गटनेते अॅड. शैलेश गोजमगुंडे, महिला आघाडी प्रमुख ज्योती पांढरे, सरचिटणीस तुकाराम गोरे, शिरीष कुलकर्णी, युवा मोर्चाचे अध्यक्ष तथा नगरसेवक नितीन वाघमारे उपस्थित होते.
जनतेने दिलेल्या आशिर्वादामुळे लोकप्रतिनिधी म्हणून काम करण्याची संधी प्राप्त होते. या संधीचा उपयोग लोकहितासाठीच होणे आवश्यक आहे. मात्र मागील काळात लोकप्रतिनिधींनी वैयक्तीक स्वार्थ आणि आपला अहंकार जपल्यामुळे सर्वांगीण विकास शक्य झाला नाही. मात्र आपण जनहिताला प्राधान्य देत असून या भावनेतूनच वैयक्तिक स्वार्थ आणि अहंकार बाजूला ठेऊन रेल्वे बोगीचा प्रकल्प मंजूर करुन घेण्यात यश प्राप्त झालेले आहे. त्याच प्रमाणे सर्व लोकप्रतिनिधींनी वैयक्तीक स्वार्थ आणि अहंकार बाजूला ठेवल्यास शहरासह जिल्हयाचा सर्वांगीण विकास सहज शक्य होईल असे प्रतिपादन पालकमंत्री संभाजीराव पाटील निलंगेकर यांनी केले.
या प्रसंगी खा. डॉ. सुनिल गायकवाड यांनी पालकमंत्री निलंगेकर व अभिमन्यु पवार यांच्या प्रयत्नातून रेल्वे बोगीचा प्रकल्प मंजूर झाल्याबद्दल त्यांचे अभिनंदन केले. तसेच राज्यातील रेल्वे विकासाला गती मिळावी या करिता पालकमंत्री निलंगेकर यांची नोडल अधिकारी म्हणून नियुक्ती झाली असून या माध्यमातून त्यांनी रेल्वेचे प्रश्न सोडविण्यासाठी प्रयत्न करावेत असे सांगून लातूर- गुलबर्गा हा रेल्वे मार्ग निलंगा येथून नेण्यासाठी आपण सर्वोतोपरी सहकार्य करु असा शब्द दिला. या प्रसंगी अभिमन्यू पवार यांनी रेल्वे बोगीचा प्रकल्प लातूर जिल्ह्यात आणण्यासाठी आम्ही फक्त निमित्त असल्याचे सांगून याचे सर्व श्रेय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचेच आहे, असे स्पष्ट केले. लातूर जिल्ह्याचा झालेला पुनर्जन्म व जिल्हावासियांनी दिलेल्या प्रेमापोटीच या प्रकल्पासाठी मुख्यमंत्र्यांचे वजन लातूरच्या पदरात पडले आहे, असे सांगितले. त्यामुळे या सत्काराचे मानकरी आम्ही नसून मुख्यमंत्रीच आहेत, अशी कृतज्ञता व्यक्त करून हा सत्कार आम्ही त्यांना समर्पित करतो, असे सांगितले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून केवळ विकासालाच प्राधान्य देण्यात येते. या करिता कोणत्याही टिका, टिपण्णी व आरोपांकडे दुर्लक्ष करतात, असे सांगून त्यांच्या संयमी स्वभावाची माहिती दिली. त्यानुसारच प्रत्येक लोकप्रतिनिधींनी व कार्यकर्त्यांनी काम करून आईरुपी पक्षाला मोठे करावे, असे आवाहन केले.
Comments