महापौर, उप महापौरांनी मनपाला वेळ द्यावा- पालकमंत्री
लातूर: लातूरचे महापौर आणि उप महापौर तसेच भाजपाचे नगरसेवक मनपात सहसा भेटत नाहीत अशी तक्रार पालकमंत्र्यांच्याही कानी गेली असावी. यामुळेच त्यांनी परवा एका कार्यक्रमात मोलाचा सल्ला दिला. प्रत्येक नगरसेवकाने किमान दोन तास प्रभागातील समस्येला देऊन जनतेच्या अडचणी सोडविण्यासाठी त्यांच्याशी संपर्क साधावा, असे सांगून महापौर व उपमहापौर यांनी आपल्या कार्यालयात किमान चार तास बसून आलेल्या जनतेचे समाधान करावे, असे आवाहन केले. कोणताही प्रकल्प किंवा विकास काम यशस्वी करण्यासाठी सामुहिक प्रयत्नाची गरज असून ही सामुहिक ताकदच पक्षाला मोठे करण्यासाठी महत्वाची आहे. त्यामुळे आपापसातील मतभेद बाजूला ठेवून जनता व पक्षहितासाठी कार्यरत रहावे असा इशारा देऊन आगामी काळात शहरात सकारात्मक बदल दिसण्याकरिता प्रमुख कामांना प्रधान्य द्यावे याकरिता पाहिजे ती ताकद माझ्या व अभिमन्यू पवार यांच्या माध्यमातून तुमच्या पाठीशी उभी करण्यात येईल, अशी ग्वाही दिली. टेंभी रेल्वे बोगी कारखाना मिळवल्याबद्दल पालकमंत्री, खासदार आणि मुख्यमंत्र्यांची स्वीय सहाय्यक अभिमन्यू पवार यांचा सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला होता. कृतज्ञता सोहळा या नावाने हा कार्यक्रम एसएमआर क्लब येथे पार पडला.
Comments