लातूर: समानता आणि सर्वंकष न्यायाच्या धोरणानुसार नीट परिक्षा केंद्र लातूरला व्हावे, अशी मागणी लातूर लोकसभा युवक काँग्रेसचे अध्यक्ष तथा जिल्हा परिषदेचे सदस्य धीरज देशमुख यांनी लावून धरली होती. या मागणीला विद्यार्थ्यी, पालक आणि लातूरातील शिक्षण संस्थांनीही पाठिंबा दिलेला होता. गेली वर्षभर सोशल मिडीयाच्या माध्यमातून लातूरला नीट केंद्र व्हावे, यासाठी प्रयत्न सुरुच होता. अखेर शासनाने लातूरला नीट केंद्र मंजूर केले. यामुळे सुमारे १० ते १२ हजार विद्यार्थ्यांचा मोठा प्रश्न सुटला आहेअसे प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे.
शिक्षणाची पंढरी असलेल्या लातूर जिल्ह्यातून साधारणत: १० ते १२ हजार विद्यार्थी तर संपूर्ण मराठवाडयातून किमान ४० हजार विद्यार्थी नीट परिक्षा दरवर्षी देत असतात. इतकी मोठी विद्यार्थी संख्या असताना संपूर्ण मराठवाडयात केवळ औरंगाबाद व नांदेड येथेच नीट परिक्षेचे केंद्र दिलेले होते. त्यामुळे मराठवाडयातील सर्व भागांतून विद्यार्थी व पालकांना परिक्षेच्या अदल्या दिवशीच औरंगाबाद किंवा नांदेड गाठावे लागत असे. ४० हजार विद्यार्थी आणि ४० हजार पालक म्हणजेच ८० हजार विद्यार्थी व पालकांची औरंगाबाद आणि नांदेडमध्ये राहण्याची व खाण्याची कशी सोय होणार. १५० ते ३५० किलो मीटर प्रवास करुन तेथील गैरसोयींना सामोरे जात ताणतणावात विद्यार्थी नीटची परिक्षा देतील कशी? या विचाराने पालक त्रस्त झाले होते. विद्यार्थ्यांमध्ये नीट परिक्षेविषयी चिंता होती. लातूरमधील नीट परिक्षार्थ्यांच्या संख्या लक्षात घेता लातूरला नीट परिक्षा केंद्र द्यावी, अशी मागणी धीरज देशमुख यांनी विद्यार्थी, प्राचार्य, प्राध्यापकांसह ३१ मार्च २०१७ रोजी तत्कालीन जिल्हाधिकारी पांडूरंग पोले यांच्याकडे केली होती.
०६ मे रोजी होणार लातूर केंद्रावर नीट परिक्षा
नीट परीक्षा केंद्र लातूरला मंजूर झाल्याचा आनंद विद्यार्थी, पालक, प्राचार्य, प्राध्यापकांना आहे. ०६ मे रोजी लातूर केंद्रावर नीटची पहिली परिक्षा होणार आहे. सुमारे १० ते १२ हजार विद्यार्थ्यांची सोय लातूर केंद्रावर होणार असून त्यामुळे विद्यार्थी व पालकांना पैसा व वेळ तर वाचणार आहेच शिवाय बाहेर गावी जाऊन परिक्षा देण्याचा ताणतणावही राहणार नाही, असे राजर्षी शाहू महाविद्यालयातील सीईटी सेलचे प्रमुख प्रा. डीके देशमुख यांनी म्हटले आहे.
Comments