लातूर: लातूरच्या विवेकानंद कर्करोग हॉस्पिटलला केंद्र सरकारने उच्चस्तरीय कर्करोग उपचार केंद्राची मान्यता दिली आहे. त्यामुळे कर्करुग्णांना अत्याधुनिक पद्धतीने उपचार घेणे शक्य झाले आहे. वैद्यकीय सेवेत अग्रगण्य असणाऱ्या विवेकानंद वैद्यकीय प्रतिष्ठानला नजीकच्या काळात रुग्णसेवा आणखी गतिमान करण्यासाठी पंतप्रधान डायलिसिस योजनाही मंजूर करू, असे प्रतिपादन केंद्रीय आरोग्यमंत्री जगतप्रकाश नड्डा यांनी केले.
येथील विवेकानंद वैद्यकीय प्रतिष्ठानद्वारा संचलित विवेकानंद कॅन्सर हॉस्पिटलला केंद्र शासनाने उच्चस्तरीय कर्करोग उपचार केंद्राची मान्यता दिली आहे. त्याचाच भाग म्हणून हॉस्पिटलला उपलब्ध करून देण्यात आलेल्या लिनिअर अक्सिलरेटर या अत्याधुनिक उपकरणाचा लोकार्पण सोहळा केंद्रीय आरोग्य मंत्री नड्डा यांच्या हस्ते पार पडला. त्यावेळी ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी खासदार डॉ. सुनील गायकवाड हे होते. यावेळी पालकमंत्री संभाजी पाटील निलंगेकर हे होते. यावेळी टाटा कॅन्सर हॉस्पिटलचे अकॅडमिक्स संचालक डॉ. कैलाश शर्मा, विवेकानंद वैद्यकीय प्रतिष्ठानच्या अध्यक्षा डॉ. सौ. अरुणा देवधर, प्रतिष्ठानचे उपाध्यक्ष लक्ष्मीकांत कर्वा, कॅन्सर सर्जन डॉ. ब्रिजमोहन झंवर, रेडिएशन ऑन्कॉलॉजिस्ट डॉ. प्रमोद टिके आदींची मंचावर उपस्थिती होती. या लोकार्पण सोहळ्यास प्रकल्प प्रमुख डॉ. अशोकराव कुकडे, प्रतिष्ठानचे संस्थापक सदस्य डॉ. गोपीकिशन भराडिया, सत्यनारायणजी कर्वा, डॉ. सौ. ज्योत्स्ना कुकडे यांसह जिल्हाधिकारी जी. श्रीकांत, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष मिलिंद लातुरे, उपाध्यक्ष रामचंद्र तिरुके, महापौर सुरेश पवार यांचीही उपस्थिती होती.
यावेळी बोलतांना केंद्रीय आरोग्यमंत्री जगतप्रकाश नड्डा पुढे म्हणाले की, केंद्रातील मोदी सरकारने सामन्यासाठी अनेक आरोग्यविषयक योजना सुरु केल्या आहेत. एखाद्या रोगाची लागण झाल्यानंतर उपचार सुरु करण्याऐवजी रोगाची लागण होऊ नये म्हणून उपाययोजना करणे आवश्यक असते. त्याच धर्तीवर केंद्राचे धोरण कार्यरत आहे. लोकांच्या आरोग्याला प्राधान्य देणारे आपले सरकार देश २० अद्यावत स्टेट कँसर सेंटर उभारणार असून औरंगाबादच्या हॉस्पिटलच्या कामाचा शिलान्यास सोहळा उरकून आपण लातूरला आलो असल्याचे त्यांनी सांगितले.
अध्यक्षीय समारोपात खा. डॉ. सुनील गायकवाड यांनी विवेकानंद कॅन्सर हॉस्पिटलचे नाव राष्ट्रीय पंतप्रधान रिलीफ फंड योजनेत समाविष्ट करण्याची विनंती आरोग्य मंत्र्यांकडे केली. कार्यक्रमाचे प्रास्तविक डॉ. ब्रिजमोहन झंवर यांनी केले. डॉ. प्रमोद टिके यांनी लिनिअर अक्सिलरेटर या अत्याधुनिक उपकरणाविषयी माहिती दिली. केंद्र सरकारने या उपकरणावरील आयात शुल्कात कपात करण्याची मागणीही त्यांनी केली.
Comments