HOME   लातूर न्यूज

आदिवासी धनगर साहित्य संमेलनाची उत्साहात सांगता

समग्र भारतासाठी इतर मागासवर्गीयांनी एकत्र यावे : डॉ. कांचा इलैय्या सेफर्ड


आदिवासी धनगर साहित्य संमेलनाची उत्साहात सांगता

लातूर: धनगर समाजाचा इतिहास खूप मोठा असून तो उच्चवर्णीयांकडून लपवला गेला असल्याचे सांगून समग्र भारत घडविण्यासाठी धनगर जमातींसह इतर मागासवर्गीयांनी योगदान द्यावे असे प्रतिपादन ख्यातनाम साहित्यिक व ज्येष्ठ विचारवंत डॉ. कांचा इलैय्या सेफर्ड यांनी दुसऱ्या आदिवासी साहित्य संमेलनाच्या समारोप प्रसंगी बोलतांना केले.
धनगर साहित्य परिषदेच्या वतीने आयोजित केलेल्या दुसऱ्या आदिवासी धनगर संमेलनाची सांगता रविवारी सायंकाळी उत्साहपूर्ण वातावरणात झाली. यावेळी पालकमंत्री संभाजी पाटील निलंगेकर यांचीही उपस्थिती होती. या समारंभात डॉ. कांचा इलैया सेफर्ड यांना संत कनकदास जीवन गौरव पुरस्काराने गौरविण्यात आले. एक लाख रुपये, शाल, श्रीफळ, सन्मानचिन्ह असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. याच कार्यक्रमात ज्येष्ठ पत्रकार राही भिडे यांनाही सन्मानित करण्यात आले. यावेळी श्रीमती संगीत धायगुडे, जयसिंगतात्या शेंडगे, अण्णाराव पाटील, अभिमन्यू टकले, प्रा. सुभाष भिंगे, भाऊसाहेब हाके पाटील, संभाजी सूळ, अमोल पांढरे, संजय चोरमले, बाळकृष्ण धायगुडे यांसह अनेक मान्यवर उपस्थित होते. डॉ. कांचा इलैय्या सेफर्ड यावेळी बोलतांना म्हणाले की, काळ्या आईची अर्थात मातृभूमीची सेवा करणारा खऱ्या अर्थाने देशाचा मालक असतो. दुग्धउत्पादनात महत्वाची भूमिका बजावणाऱ्या मेंढीला राष्ट्रीय पशूचा दर्जा मिळाला पाहिजे. धनगर समाजाचे योगदान सैन्यातही मोलाचे राहिले आहे. धनगर समाजाची बटालियन आहिर बटालियन म्हणून ओळखली जायची. धनगर समाजाचा युद्धातही सहभाग होता. आजघडीला योगाला महत्व दिले जाते. पण, योगाने देशाचे संरक्षण करता येत नाही. त्यासाठी सीमेवर लढणारा ताकतवर युवा हवाय. धनगर समाजातील पालकांनी आपल्या मुलांना इंग्रजी शिकवले पाहिजे. धनगर समाज बांधवांनी आपली मुले इंग्रजी माध्यमाच्या शाळेत घातली पाहिजेत. इंग्रजी शिकणारी व्यक्ती कधीही गुलामी करत नाही. मनुवाद्यांनी धनगर समाजाचा खरा दडपण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप करून डॉ. इलैया यांनी मनुवाद्याला गाडून टाका व आंबेडकरवाद आणण्याचे आवाहन केले. महिलांना समानतेची वागणूक देणे महत्वाचे असल्याचेही त्यांनी सांगितले.
यावेळी पालकमंत्री संभाजी पाटील निलंगेकर, पत्रकार राही भिडे यांनीही आपले विचार व्यक्त केले. या धनगर साहित्य संमेलनात धनगर जमातीला भारतीय राज्यघटनेने दिलेल्या अनुसूचित जमातीच्या आरक्षणाची अंमलबजावणी तातडीने करण्यात यावी, धनगरांना अनुसूचित जातीचे दाखले देण्य्ची सुरुवात करावी, सोलापूर विद्यापीठाच्या नामांतराचा प्रश्न तात्काळ सोडवावा . अहिल्यादेवी होळकर यांचे नांव सोलापूर विद्यापीठास दिल्यासंदर्भात शासकीय अध्यादेश काढावा. उच्च व तंत्रशिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी विधान परिषदेत केलेले अहिल्यादेवी बाबतचे जातीवाचक विधान तात्काळ मागे घ्यावे आणि धनगर समाजाचे इतर प्रश्न सोडवावेत. महाराजा यशवंतराव होळकर यांचे जन्मस्थळ असलेले वाफेगाव येथील राजवाडा सरकारने ताब्यात घेऊन आंतरराष्ट्रीय दर्जाचे ऐतिहासिक स्मारक उभे करावे. धनगर जमातीमधील विद्यार्थ्यांना शैक्षणिक सोयीसाठी प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी शासकीय वसतिगृहे सुरु करावीत, वाढत्या महागाईचा विचार करून विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्तीमध्ये वाढ करावी, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेळी - मेंढी विकास महामंडळाच्या अखत्यारीतील चारा व कुरणांच्या राखीव जागा जैसे थे ठेवाव्यात. त्या जागा कोणत्याही कारणासाठी कोणासही हस्तांतरित करू नयेत, शेळी मेंढीपासून उस्मानाबादी शेळीची पैदास उद्योगासाठी विशेष प्रयत्न करावेत, महाराजा यशवंतराव होळकर यांच्या नांवाने स्वतंत्र आर्थिक विकास महामंडळाची स्थापना करावी. या महामंडळास २५ हजार कोटींचे भागभांडवल उपलब्ध करून द्यावे, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर, थोरले सुभेदार मल्हारराव होळकर, महाराजा यशवंतराव होळकर, महाराणी तुळसाबाई होळकर, व आद्य महिला स्वातंत्र्य सेनानी भीमाबाई होळकर यांचे चरित्रग्रंथ सरकारने प्रकाशित करावे, आ. गणपतराव देशमुख यांना भारतरत्न पुरस्काराने सन्मानित करावे, जनगणनेनुसार जातीनिहाय धनगर समाजाची लोकसंख्या जाहीर करण्यात यावी, दलित वस्तीप्रमाणे धनगर वस्तीची उभारणी करण्यात यावी असे ठरव या साहित्य संमेलनात मांडण्यात आले. ​


Comments

Top