HOME   लातूर न्यूज

गारपीटग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने मदत करा- धीरज देशमुख


गारपीटग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने मदत करा- धीरज देशमुख

लातूर: लातूर जिल्ह्याला रविवारी गारपिटीचा तडाखा बसला आहे. जिल्ह्यातील लातूर, रेणापुर, व चाकूर या तालुक्यांसह मांजरा पट्टयालाही गारपिटीचा सर्वाधिक फटका बसला आहे. हाताशी आलेल्या रब्बी पिकांचे प्रचंड नुकसान झालेले आहे. वीज पडून पशुधनही दगावले आहे. सरकारने या नुकसानीचा पंचनामा करुन गारपीटग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने मदत करावी, अशी मागणी लातूर लोकसभा युवक काँग्रेस अध्यक्ष तथा जिल्हा परिषदेचे सदस्य धीरज देशमुख यांनी केली आहे. कायम दुष्काळाशी सामना करणाऱ्या लातूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना यंदा पावसाने चांगली साथ दिली होती. त्यामुळे सर्वच शेतशिवारांनी पिके डोलू लागली. शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर आनंद ओसंडून वाहत असतानाच निसर्गाने रविवारी थैमान घालून शेतकऱ्यांचे मोठे नुकसान केले आहे. यंदा पिके चांगली आल्याने अनेक शेतकऱ्यांनी पिकविमा भरणे टाळले आणि गारपिटीने शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान केले. लातूर, रेणापूर आणि चाकूर या तालुक्यांना गारपिटीचा मोठा फटका बसला आहे. मांजरा पट्ठयातील जवळपास सर्वच गावांत पाऊस आणि गारपीट झाली आहे. लातूर तालुक्यातील बोरगाव काळे येथे वीज पडून दोन बैल ठार झाले आहेत. सरकारने या सर्व नुकसानीचा पंचनामा करुन गारपीटग्रस्तांना तातडीने नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी देशमुख यांनी केली आहे.


Comments

Top