लातूर: येथील एमआयएमएसआर वैद्यकीय महाविद्यालय व यशवंतराव चव्हाण ग्रामीण रुग्णालयातील स्त्रीरोग विभाग येथे सौ. वर्षा शंकर देशमुख यांनी एकाच वेळी तीन बालकांना (तिळयांना) जन्म दिला आहे. जन्मलेल्या बालकांपैकी तिनही मुलीच असून मातेसह तिनही बालके सध्या सुखरुप आहेत. लातूर तालुक्यातील मुरुड येथील वर्षा देशमुख (वय २५ वर्षे) या गर्भधारणेच्या काळात यशवंतराव चव्हाण ग्रामीण रुग्णालयातील स्त्रीरोग विभागात उपचार घेत होत्या. दरम्यान ०५ फेब्रुवारी रोजी त्यांची स्त्रीरोग विभाग प्रमुख डॉ. सी. एस. पाटील यांनी नियमीत तपासणी केली असता त्यांना गर्भधारणेचे दिवस भरण्याअगोदरच प्रसुतीचे लक्षणे आढळून आली. त्यामुळे त्यांना सुरक्षित प्रसुतीसाठी येथील स्त्रीरोग विभागात दाखल करण्यात आले. दरम्यान वर्षा देशमुख यांनी १० फेब्रुवारी रोजी सकाळी ८.३० वाजता तीन गोंडस मुलींना जन्म दिला. देशमुख यांच्या गर्भ पिशवीत बालके विविध अवस्थेत असल्याने सिझेरीयन शस्त्रक्रियेव्दारे सहयोगी प्राध्यापक डॉ. प्रेषित चाटे यांनी त्यांची प्रसुती केली. पहिल्या दोन बालकांची प्रसुती सुरळीत झाली मात्र तिसऱ्या बालकाच्या गळ्याभोवती नाळेचे चार वेढे असल्याने प्रसुती करणे गुंतागुंतीचे होते. मात्र डॉ. प्रेषित चाटे व त्यांच्या टिमने ही प्रसुती यशस्वीरित्या पुर्ण केली. या प्रसुतीसाठी त्यांना डॉ. रोशनी आकुसकर, डॉ. शिल्पा नाईक, डॉ. ऋता भिसे यांनी सहाय्य केले. वर्षा देशमुख यांची ही पहिलीच प्रसुती असून त्यांना एकाच वेळी तीन कन्यारत्नांची भेट मिळालेली आहे. यशवंतराव चव्हाण ग्रामीण रुग्णालयात पहिल्यांदाच तिळ्यांचा जन्म् झालेला आहे. वर्षा देशमुख यांच्या सिझेरीयन शस्त्रक्रियेसह प्रसुतीचा पूर्ण खर्च पुर्णब्रम्हयोगीनी त्यागमुर्ती श्रीमती प्रयागअक्का कराड या योजनेंतर्गत करण्यात आला.
Comments